विजय हजारे करंडकात उपांत्य सामन्याआधी मुंबईच्या संघाची ताकद वाढली आहे. कारण रोहित शर्मासोबत, विंडीज दौऱ्यात आश्वासक कामगिरी करणारे पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे उपांत्य सामन्यासाठी मुंबईकडून खेळणार आहेत. याआधी रोहित शर्मा उपांत्यपूर्व सामन्यात मुंबईकडून खेळला होता. आगामी विंडीजविरुद्ध मालिकेचा विचार केला असता रोहित शर्मा मुंबईकडून उपांत्य सामना खेळेल, मात्र पृथ्वी आणि अजिंक्य हे मुंबईचा संघ अंतिम फेरीत पोहचल्यास संघाकडून खेळण्यासाठी हजर असतील.
मुंबईच्या निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी रोहित-पृथ्वी आणि अजिंक्य हे उपांत्य सामन्यासाठी हजर असल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. उपांत्यपूर्व फेरीत मुंबईने बिहारवर 9 गडी राखून मात करत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. उपांत्य फेरीत मुंबईसमोर हैदराबादचं आव्हान असणार आहे, 17 ऑक्टोबरला बंगळुरुला हा सामना रंगणार आहे. पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणेने या स्पर्धेत साखळी फेरीच्या सामन्यांमध्ये मुंबईचं प्रतिनिधीत्व केलं होतं. त्यामुळे या 3 प्रमुख खेळाडूंच्या उपस्थितीत मुंबईचा संघ हैदराबादचं आव्हान कसं पूर्ण करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.