बांगलादेशविरुद्धच्या वन डे आणि टी२० मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. शिखा पांडेला दोन्ही फॉरमॅटमध्ये संघात स्थान मिळालेले नाही. या वरिष्ठ वेगवान गोलंदाजाला संघातून वगळण्याच्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. शिखा पांडे भारतीय महिला संघात निवडीसाठी उपलब्ध असलेल्या सर्वात वरिष्ठ वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. तिने महिला प्रीमियर लीग २०२३ मध्ये देखील चांगली कामगिरी केली होती, परंतु तिला संघातून वगळण्यात आले आहे. अशा स्थितीत तिला याबाबत प्रश्न विचारला असता ती ढसाढसा रडू लागली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिखा पांडे डब्ल्यूपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाज होती आणि तिच्या संघाला अंतिम फेरीत नेण्यात तिची महत्त्वपूर्ण भूमिका होती. दिल्लीने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावत अंतिम फेरी गाठली होती. शिखा पांडेला विनाकारण भारतीय संघातून वगळण्याची ही पहिलीच वेळ नाही. शिखा उजव्या हाताची वेगवान गोलंदाज आहे आणि फलंदाजीत खालच्या ऑर्डरमध्ये उपयुक्त फलंदाज देखील आहे. या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेत झालेल्या टी२० विश्वचषकासाठी तिने भारतीय संघात पुनरागमन केले. त्यानंतर तिला बीसीसीआयच्या केंद्रीय करारातून वगळण्यात आले. त्यानंतर तिला बांगलादेशविरुद्धच्या वन डे आणि टी२० संघातूनही डच्चू दिला.

भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक डब्ल्यूव्ही रमन यांच्या मुलाखतीत स्पोर्टस्टारशी बोलताना पांडेला संघ निवडीबद्दल विचारले असता तिच्या भावनांचा बांध फुटला आणि रडू लागली. ३४ वर्षीय शिखा म्हणाली, “मी निराश आणि रागावलेली नाही, असे जरी मी म्हणते, तरी मी एक माणूस आहे. जेव्हा तुम्ही केलेल्या कामाचे फळ तुम्हाला मिळत नाही तेव्हा हे असे नकार पचवणे कठीण असते. मला खात्री आहे की यामागे काहीतरी वेगळे कारण आहे, जे मला माहित नाही. कठोर परिश्रम करणे हे माझ्या हातात आहे आणि कठोर परिश्रमावर माझा विश्वास आहे. त्यामुळे मी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त होईपर्यंत अधिक मेहनत करेन.

पांडेने आपल्या कारकिर्दीत भारतासाठी एकूण १२० सामने खेळले आहेत. एकदिवसीय आणि टी२० मध्ये तिचा रेकॉर्ड अप्रतिम आहे. २०२२च्या विश्वचषक स्पर्धेसाठी निवड न झाल्यामुळे तिच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती, परंतु या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेत झालेल्या टी२० विश्वचषक संघाचा ती भाग होती.

पांडेने तिच्या कारकिर्दीच्या कठीण टप्प्यात तिच्याभोवती चांगले मार्गदर्शक असण्याचे महत्त्व नमूद केले आणि रमण यांनी केलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभारही मानले. ती म्हणाली, “जेव्हा मला संघातून वगळण्यात आले तेव्हा मला वाटले की क्रिकेटपासून दूर जाणे योग्य आहे. त्यावेळी असे सुचवण्यात आले की हा एक भावनिक काळ आहे आणि मला स्वतःला अधिक वेळ देण्याची गरज आहे. तुम्हाला वाटले की माझ्यात अजून बरेच क्रिकेट शिल्लक आहे आणि जोपर्यंत मी खेळाचा आनंद घेत आहे तोपर्यंत मी खेळले पाहिजे. मी सध्या निराश आहे, पण ज्या परिस्थितीत आहे तिथून बाहेर येणे माझ्या नियंत्रणाबाहेर आहे, त्यातून बाहेर पडण्यासाठी मी जे निर्णय घेते ते मात्र पूर्णपणे माझ्या हातात आहे.”

बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय संघात रेणुका सिंग आणि ऋचा घोष ही इतर मोठी नावे होती ज्यांचा समावेश नव्हता. डब्ल्यूपीएलमध्ये चांगल्या कामगिरीनंतर संघाचा भाग न होता आल्याने पांडे निराश आहे. या वर्षाच्या अखेरीस इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सर्व फॉरमॅटच्या मालिकेसाठी तिला संघात पुनरागमन करण्याची आशा आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shikha pandey expressed her feelings after not being selected in the indian team video of crying in front of the camera went viral avw
Show comments