‘अ’ संघ अनधिकृत कसोटी
भारतीय संघात पुनरागमनासाठी उत्सुक खेळाडूंसाठीची रंगीत तालीम, असे वर्णन होणाऱ्या बांगलादेश ‘अ’ संघाविरुद्धच्या अनधिकृत कसोटीत सलामीवीर शिखर धवनने तडाखेबंद शतकाची नोंद केली. तत्पूर्वी, वरुण आरोन आणि जयंत यादव यांच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर भारतीय ‘अ’ संघाने बांगलादेशचा पहिला डाव २२८ धावातच गुंडाळला. प्रत्युत्तरादाखल खेळताना पहिल्या दिवसअखेर भारतीय ‘अ’ संघाने १ बाद १६१, अशी मजल मारली आहे.
भारतीय अ संघाचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सौम्या सरकार आणि मोमिनूल हक यांना भोपळाही फोडू न देता वरुण आरोनने हा निर्णय सार्थ ठरवला. ईश्वर पांडेने अनामूल हकला माघारी धाडले. लिट्टन दासला तंबूचा रस्ता दाखवत वरुणने बांगलादेशची अवस्था ४ बाद ६ अशी केली. मात्र, यानंतर सब्बीर रहमान आणि नासिर हौसेन यांनी पाचव्या विकेटसाठी ४४ धावांची भागीदारी करत डाव सावरला. नासिरला ३२ धावांवर अभिमन्यू मिथुनने बाद केले. यानंतर सब्बीरला शुवागता होमची साथ मिळाली. या जोडीने सहाव्या विकेटसाठी १३२ धावांची संयमी भागीदारी केली. अर्धशतकानंतर शुवागताला वरुणने बाद केले. त्याने ६२ धावा केल्या. जयंत यादवने बांगलादेशच्या तळाच्या फलंदाजांना झटपट बाद केले आणि बांगलादेशचा डाव २२८ धावातच आटोपला. सब्बीरने २३ चौकार आणि एका षटकारासह नाबाद १२२ धावांची खेळी केली. जयंतने २८ धावात, तर वरुणने ४५ धावात प्रत्येकी ४ बळी घेतले.
दुखापतीमुळे श्रीलंका दौऱ्यातून माघार घ्यावी लागलेल्या शिखर धवनने बांगलादेशच्या गोलंदाजांवर प्रहार करून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले. शिखर आणि अभिनव मुकुंद जोडीने १५३ धावांची खणखणीत सलामी दिली. भागीदारीदरम्यानच शिखरने शतक पूर्ण केले. शुवागता होमने मुकुंदला ३४ धावावर बाद केले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा शिखर ११६, तर श्रेयस अय्यर ६ धावावर खेळत आहेत. शिखरने १६ चौकार आणि २ षटकारांसह बांगलादेशच्या गोलंदाजांवर आक्रमण गाजवले. भारतीय संघ ६७ धावांनी पिछाडीवर आहे.
संक्षिप्त धावफलक : बांगलादेश ‘अ’ (पहिला डाव) २२८ (सब्बीर रहमान १२२, शुवागता होम ६२, जयंत यादव ४/२८, वरुण आरोन ४/४५) विरुद्ध भारत ‘अ’ (पहिला डाव) शिखर धवन खेळत आहे ११६, अभिनव मुकुंद ३४, शुवागता होम १/३७

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा