ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वन-डे सामन्याआधी भारताचा सलामीवीर शिखर धवनने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघार घेतली आहे. आपल्या आजारी बायकोची काळजी घेण्यासाठी शिखर धवनला संघातून सुट्टी देण्यात आलेली आहे. १७ सप्टेंबरला भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला वन-डे सामना रंगणार आहे. याआधीही श्रीलंका दौऱ्यात पाचवा वन-डे सामना आणि एकमेव टी-२० सामन्यात आपल्या आजारी आईची काळजी घेण्यासाठी धवन लंकेचा दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतला होता. शिखरची बायको आयेशा मुखर्जी ही एक प्रोफेशनल बॉक्सर आहे. हरभजन सिंहच्या मध्यस्थीने शिखर आणि आयेशाची भेट झाली. २०१२ साली शिखर आणि आयेशाचं लग्न झालं. २०१४ साली दोघांनाही एक गोंडस मुलगा झाला. शिखरने आपल्या मुलाचं नाव झोरावर असं ठेवलं आहे.
सध्या बीसीसीआयने शिखर धवनच्या जागी संघात कोणत्याही नवीन खेळाडूची घोषणा केलेली नाहीये. त्यामुळे शिखरच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल किंवा अजिंक्य रहाणे भारताच्या डावाची सुरुवात करु शकतील. इंग्लंडमध्ये पार पडलेल्या चॅम्पियन्स करंडकात शिखर धवनने भारतीय संघात पदार्पण केलं. यानंतर वेस्ट इंडिज, श्रीलंका दौऱ्यात शिखरचा धडाकेबाज फॉर्म कायम आहे.
शिखर धवनच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे सलामीचे फलंदाज कशी कामगिरी करतात हे पहावं लागणार आहे. अजिंक्य रहाणेचं वन-डे संघातलं स्थान अजुनही पक्क नाहीये. वेस्ट इंडिज दौऱ्यात रहाणेला शिखर धवनसोबत सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती, या दौऱ्यात त्याने आक्रमक फलंदाजी करत मालिकेत सर्वाधीक धावा करुन मालिकावीराचा किताब पटकावला होता. त्यामुळे धवनच्या अनुपस्थितीत वन-डे संघात आपलं स्थान पक्क करण्यासाठी रहाणेकडे संधी असणार आहे.