Shikhar Dhawan announced his retirement from domestic and international cricket : भारताचा सलामीवीर शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. धवनने शनिवारी सकाळी एक व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना हा निर्णय कळवला. शिखर धवनला टीम इंडियाचा गब्बर आणि क्रिकेट विश्वात मिस्टर आयसीसी म्हणून ओळखले जायचे. त्यामुळे आज आपण टीम इंडियाच्या गब्बरला क्रिकेट विश्वात मिस्टर आयसीसी म्हणून का ओळखले जायचे? याबद्दल जाणून घेऊया.

शिखर धवनची गणना जागतिक क्रिकेटमधील यशस्वी सलामीच्या फलंदाजांमध्ये केली जाते. २०२२ मध्ये बांगलादेश दौऱ्यावर खेळलेल्या वनडे मालिकेत तो भारतीय संघाकडून शेवटचा खेळला होता. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करताना पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये शिखर धवन म्हणाला की, ‘आज मी अशा वळणावर उभा आहे की जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा मला फक्त आठवणी दिसतात आणि जेव्हा मी पुढे पाहतो तेव्हा मला संपूर्ण जग दिसते. भारतासाठी खेळण्याचे माझे नेहमीच एक ध्येय होते आणि ते पूर्ण झाले ज्यासाठी मी अनेक लोकांचा आभारी आहे.’

शिखर धवनला मिस्टर आयसीसी का म्हणतात?

आयसीसी स्पर्धांमध्ये शिखर धवनची बॅट खूप चमकायची. त्याच्या नावावर नोंदवलेले रेकॉर्ड याचा पुरावा आहेत. शिखर धवन हा आयसीसी वनडे टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक सरासरी धावा करणारा खेळाडू आहे. किमान १००० धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये धवनने ६५.१५ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तो ६४.५५ च्या सरासरीने धावा करणाऱ्या विराट कोहलीच्याही पुढे आहे. शिखर धवन २००४ च्या अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता आणि त्याला टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला होता. शिखर धवनने २०१० मध्ये टीम इंडियात पदार्पण केले. तो २०११ साली झालेल्या एकदिवसीय विश्वचषकाचा भाग नव्हता. मात्र, यानंतर २०१३ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघाचा भाग होता.

हेही वाचा – महाराजा ट्रॉफी स्पर्धेत सुपर ओव्हरची हॅट्ट्रिक; टाय सामन्याचा निकाल लावताना अनोखा विक्रम, पाहा VIDEO

२०१३ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत शिखर धवन सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. या स्पर्धेतील उत्कृष्ठ कामगिरीसाठी त्याला गोल्डन बॅटही मिळाली. धवनने पाच डावात ३६३ धावा केल्या होत्या. रोहित शर्मासोबतची त्याची सलामीची जोडी हिट ठरली. तसेच २०१५ च्या वर्ल्ड कपमध्येही धवनच्या बॅटने चांगली कामगिरी केली होती. तो भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. धवनने ८ सामन्यात ५१.५० च्या सरासरीने ४१२ धावा केल्या होत्या. सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो पाचव्या स्थानावर राहिला होता.

हेही वाचा – Shikhar Dhawan : टीम इंडियाच्या ‘गब्बर’चा क्रिकेटला अलविदा, भावनिक VIDEO शेअर करत जाहीर केली निवृत्ती

शिखर धवनची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द –

डावखुरा सलामीवीर फलंदाज शिखर धवनला २०१० मध्ये भारतीय क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली, जेव्हा त्याला ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेत खेळण्याची संधी मिळाली. यानंतर शिखर धवनने मागे वळून पाहिले नाही आणि त्याला टीम इंडियासाठी ३४ कसोटी, १६७ एकदिवसीय आणि ६८ टी-२० सामने खेळण्याची संधी मिळाली. धवनने कसोटी क्रिकेटमध्ये ४०.६१ च्या सरासरीने २३१५ धावा केल्या, तर त्याने ७ शतके आणि ५ अर्धशतकेही झळकावली. याशिवाय, वनडेमध्ये धवनने ४४.११ च्या सरासरीने ६७९३ धावा केल्या ज्यात १७ शतके आणि ३९ अर्धशतकांचा समावेश आहे. धवनने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ११ अर्धशतकांसह २७.९२ च्या सरासरीने १७५९ धावा केल्या आहेत.