Wasim Jaffer Tweet on Shikhar Dhawan Retirement : टीम इंडियाचा अनुभवी सलामीवीर शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. शिखर धवन एके काळी भारतीय संघाच्या फलंदाजीच्या क्रमाचा भक्कम आधारस्तंभ होता, पण काळानुसार गोष्टी बदलल्या आणि तो संघाबाहेर पडला. शिखर धवनने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना १० डिसेंबर २०२२ मध्ये खेळला होता. शिखर धवनने अचानकपणे सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने त्याच्याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
शिखर धवन २०२२ मध्ये बांगलादेश दौऱ्यावर खेळलेल्या वनडे मालिकेत तो भारतीय संघाकडून शेवटचा खेळला होता. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करताना पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये शिखर धवन म्हणाला की, ‘आज मी अशा वळणावर उभा आहे की जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा मला फक्त आठवणी दिसतात आणि जेव्हा मी पुढे पाहतो तेव्हा मला संपूर्ण जग दिसते. भारतासाठी खेळण्याचे माझे नेहमीच एक ध्येय होते आणि ते पूर्ण झाले ज्यासाठी मी अनेक लोकांचा आभारी आहे.’
जितक्या कौतुकासाठी पात्र होता, तेवढे कौतुक कधीच झाले नाही –
शिखर धवनने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर वसीम जाफरने एक ट्वीट करुन त्याच्या कामगिरीचे कौतुक केले. त्याचबरोबर पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. वसीम जाफरने लिहिले, “मोठ्या स्पर्धेचा खेळाडू असणारा शिखर धवन जितक्या कौतुकासाठी पात्र होता, तेवढे कौतुक त्याचे कधीच झाले नाही. परंतु जोपर्यंत संघ जिंकत होता, तोपर्यंत त्याने कोणाचे कौतुक होत आहे याची कधीच पर्वा केली नाही. तो संघहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारा खेळाडू होता. त्याच्या अप्रतिम कारकिर्दीबद्दल अभिनंदन आणि पुढील दुसऱ्या इनिंगसाठी खूप खूप शुभेच्छा!”
हेही वाचा – Shikhar Dhawan Retirement : टीम इंडियाच्या गब्बरला ‘मिस्टर आयसीसी’ का म्हटले जाते? जा
शिखर धवनला मिस्टर आयसीसी का म्हणतात?
आयसीसी स्पर्धांमध्ये शिखर धवनची बॅट खूप चमकायची. त्याच्या नावावर नोंदवलेले रेकॉर्ड याचा पुरावा आहेत. शिखर धवन हा आयसीसी वनडे टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक सरासरी धावा करणारा खेळाडू आहे. किमान १००० धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये धवनने ६५.१५ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तो ६४.५५ च्या सरासरीने धावा करणाऱ्या विराट कोहलीच्याही पुढे आहे. शिखर धवन २००४ च्या अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता आणि त्याला टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला होता. शिखर धवनने २०१० मध्ये टीम इंडियात पदार्पण केले. तो २०११ साली झालेल्या एकदिवसीय विश्वचषकाचा भाग नव्हता. मात्र, यानंतर २०१३ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघाचा भाग होता.
हेही वाचा – महाराजा ट्रॉफी स्पर्धेत सुपर ओव्हरची हॅट्ट्रिक; टाय सामन्याचा निकाल लावताना अनोखा विक्रम, पाहा VIDEO
२०१३ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत शिखर धवन सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. या स्पर्धेतील उत्कृष्ठ कामगिरीसाठी त्याला गोल्डन बॅटही मिळाली. धवनने पाच डावात ३६३ धावा केल्या होत्या. रोहित शर्मासोबतची त्याची सलामीची जोडी हिट ठरली. तसेच २०१५ च्या वर्ल्ड कपमध्येही धवनच्या बॅटने चांगली कामगिरी केली होती. तो भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. धवनने ८ सामन्यात ५१.५० च्या सरासरीने ४१२ धावा केल्या होत्या. सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो पाचव्या स्थानावर राहिला होता.