विराट कोहलीने कसोटी संघाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आक्रमक आणि निर्भीड स्वरूपाचे क्रिकेट खेळण्याचा नारा दिला. मात्र हे सूत्र अंगीकारलेल्या भारतीय संघाची श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दाणादाण उडाली. या पडझडीत संघाचा सन्मान राखत शतक झळकावणारा सलामीवीर शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्याने विराट कोहलीच्या चिंतेत भर पडली आहे. हाताला झालेल्या दुखापतीमुळे शिखर उर्वरित दोन सामन्यांत खेळू शकणार नाही. शिखरच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे.
शिखरचा नियमित सहकारी मुरली विजय मांडीच्या स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे पहिल्या कसोटीत खेळू शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीत शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी सलामीवीराची जबाबदारी पेलली. शिखरने दिमाखदार शतकी खेळी साकारत भारतीय संघाला पहिल्या डावात महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. मात्र लोकेश राहुल दोन्ही डावांत सपशेल अपयशी ठरला. राहुलच्या ऐवजी मुरली विजय परतणार हे स्पष्ट होते. मात्र आता धवन मालिकेत खेळू शकणार नसल्याने राहुलला आणखी एक संधी मिळणार आहे. मात्र चांगल्या फॉर्मात असलेला खेळाडूच दुखापतग्रस्त झाल्याने भारतीय संघाची फलंदाजी आणखी कमकुवत झाली आहे.
‘शिखरच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे. त्यावर क्ष-किरण चाचणी करण्यात आली. मात्र दुखापत गंभीर असल्याने तो उर्वरित मालिकेत खेळू शकणार नाही. त्याला दुखापतीतून सावरण्यासाठी चार ते सहा आठवडय़ांचा कालावधी लागेल,’ असे बीसीसीआयने आपल्या पत्रकात म्हटले आहे.
वरुण आरोनच्या गोलंदाजीवर कौशल सिल्व्हाचा झेल टिपण्याच्या प्रयत्नात  शिखरच्या हाताला दुखापत झाली. या दुखापतीमुळेच दुसऱ्या डावात शिखर नेहमीच्या शैलीत खेळू शकला नाही.
दरम्यान, मुरली विजयच्या तंदुरुस्तीबाबत अद्यापही साशंकता असल्याने भारतीय संघाच्या अडचणीत भर पडली आहे. विजय खेळू न शकल्यास चेतेश्वर पुजाराला संघात संधी मिळू शकते. धवनऐवजी बदली खेळाडूची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा