Ind vs Eng : भारत विरूद्ध इंग्लंड तिसऱ्या कसोटीत भारताने इंग्लंडवर २०३ धावांनी विजय मिळवला. सामन्याच्या पाचव्या आणि अंतिम दिवशी भारताने या मालिकेतील आपल्या विजयाचे खाते उघडले. सध्या भारत २-१ ने पिछाडीवर आहे. तिसऱ्या कसोटीत इंग्लंडकडून बटलर-स्टोक्स जोडीने सामना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी १७९ धावांची भागीदारी करत इंग्लंडच्या डावाला आकार दिला. पण अखेर नव्या चेंडूवर भारताच्या जसप्रीत बुमराने ५ बळी टिपून इंग्लंडच्या डावाला सुरूंग लावला आणि भारताला इंग्लंडच्या भूमीत ४ वर्षांनी विजय मिळवून दिला. या व्यतिरिक्त, पहिल्या डावात ९७ तर दुसऱ्या डावात १०३ धावा करणाऱ्या कर्णधार विराट कोहलीला सामनावीर घोषित करण्यात आले.

तिसऱ्या कसोटीत नवोदित ऋषभ पंतनेही चांगली कामगिरी केली. त्याने पहिल्याच डावात यष्टिरक्षण करताना ५ झेल टिपले. तसेच फलंदाजी करताना पहिल्या डावात २४ धावा केल्या. त्यात पहिल्या धावा त्याने षटकार मारत कमावल्या. त्याच्या चांगल्या कामगिरीमुळे तो चर्चेत आलाच. पण त्याबरोबरच आणखी एका गोष्टीमुळे तो चर्चच्या आला आहे.

टीम इंडियाचा गब्बर म्हणजे शिखर धवन याने एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये तो नवोदित ऋषभ पंत बरोबर धावत आहे. या फोटोला शिखरने ‘भाग धन्नो भाग’ असे कॅप्शन दिले आहे.

दरम्यान, ३० ऑगस्टपासून या मालिकेतील चौथा कसोटी सामना सुरु होणार आहे.

Story img Loader