Asian Games on Shikhar Dhawan: भारतीय क्रिकेट संघ आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेणार आहे. युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली संघाची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी अनुभवी खेळाडू शिखर धवनकडे कर्णधारपद सोपवण्यात येणार असल्याचे बोलले जात होते, मात्र तसे झाले नाही. त्याला संघातही स्थान मिळाले नाही. धवनला संधी न मिळाल्याचे दु:ख त्याने व्यक्त केले आहे. संघात त्याची निवड न झाल्याने आश्चर्य त्याच्या चाहत्यांकडून व्यक्त केले जात आहे. मात्र तरीही पुनरागमनाची तयारी सुरू असल्याचे त्याने सांगितले.
३७ वर्षीय धवनने १० महिन्यांपूर्वी कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली होती परंतु निवडकर्त्यांनी यावेळी त्याला वगळले आणि ऋतुराज गायकवाडची कर्णधार म्हणून नियुक्ती केली. पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना धवन म्हणाला, “जेव्हा माझे नाव आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी संघात नव्हते, तेव्हा मला थोडा धक्का बसला होता. मग मला वाटले की, ते काहीतरी वेगळा विचार करत आहे. तुम्हाला आता फक्त ते सत्य स्वीकारावे लागेल. ऋतुराज संघाचे नेतृत्व करेल याचा मला आनंद आहे. सर्व तरुण मुले आहेत आणि मला खात्री आहे की ते चांगले काम करतील. भारताला सुवर्ण पदक जिंकून देण्यात यशस्वी होतील.”
बांगलादेश मालिकेनंतर बाहेर पडला होता
शुबमन गिलने रोहित शर्मासोबत सलामीला खेळायला सुरुवात केल्यापासून धवनचा पत्ता कट झाला आहे. भारतीय संघाने आता धवनला मागे टाकल्याचे दिसते. डिसेंबर २०२२ मध्ये बांगलादेश दौऱ्यानंतर त्याला एकदिवसीय संघातून वगळले जाईपर्यंत धवन वन डे फॉरमॅटचा मुख्य खेळाडू होता. गेल्या दशकात भारताच्या एकदिवसीय क्रिकेटमधील अव्वल फलंदाजांपैकी एक असलेल्या धवनने सांगितले की, “भविष्यात काय घडेल हे मला माहीत नाही, पण संधी मिळाल्यास तो त्यासाठी तयार असेल.”
पुनरागमन करण्यासाठी स्वत:ला तंदुरुस्त ठेवले आहे: धवन
भारताचा डावखुरा फलंदाज धवन पुढे म्हणाला, “मी निश्चितपणे पुनरागमन करण्यास उत्सुक आहे. त्यासाठी मी स्वत:ला फिट ठेवलं आहे. नेहमीच संधी असते, मग ती एक टक्के असो किंवा २० टक्के. मला अजूनही प्रशिक्षण घ्यायला आवडते त्यातून मला खेळण्याचा आनंद मिळतो. सराव करत राहणे या सर्व गोष्टी माझ्या नियंत्रणात आहेत. जो काही निर्णय घेतला जातो त्याचा मी आदर करतो. धवन अजूनही केंद्रीय करार असलेला क्रिकेटपटू आहे आणि तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये बराच वेळ घालवतो.”
आशियाई क्रीडा २०२३साठी पुरुष संघ
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक).
राखीव खेळाडू: यश ठाकूर, साई किशोर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, साई सुदर्शन.