भारताचा फलंदाजीतील नवा तारा शिखर धवन सोमवारी दक्षिण आफ्रिकेत तेजाने तळपला. दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध त्याने हल्लाबोल करीत क्रिकेटजगताला ‘धवन धमाका’ची अनुभूती देत पुन्हा एकदा थक्क केले. फक्त १५० चेंडूंत धवनने ३० चौकार आणि ७ षटकारांच्या साहाय्याने २४८ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. परंतु दुर्दैवाने त्याचा विश्वविक्रम २० धावांनी हुकला.
२७ वर्षीय धवनने ‘अ’ दर्जाच्या क्रिकेट इतिहासात मर्यादित षटकांच्या सामन्यांमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या नोंदवली. इंग्लंड आणि सरेचा माजी फलंदाज अ‍ॅलिस्टर ब्राऊन या यादीत अव्वल स्थानावर आहे. १९ जुलै २००२ रोजी ब्राऊनने सरेकडून खेळताना ग्लेमॉर्गनविरुद्ध २६८ धावांची यादगार खेळी साकारली होती.
धवनने आपले पहिले शतक ८६ चेंडूंत पूर्ण केले, तर दुसरे शतक फक्त ४६ चेंडूंत गाठले. धवनने एकंदर द्विशतक १३२ चेंडूंत साजरे केले. डावखुऱ्या धवनने हा पल्ला गाठताना सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग या भारतातील दिग्गज फलंदाजांना मागे टाकले. या दोघांनीही ‘अ’ दर्जाच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतके नोंदवली आहेत.
धवन विश्वविक्रमाकडे मार्गक्रमण करीत असताना २४८ धावांवर रुस्टी थेरॉनच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक डेन व्हिलासने त्याचा झेल टिपला. धवनने कर्णधार चेतेश्वर पुजारासोबत दुसऱ्या विकेटसाठी ३३.५ षटकांत २८५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. पुजारानेही संयमी शतक झळकावले. त्याने ९७ चेंडूंत ८ चौकारांनिशी नाबाद १०९ धावा केल्या. या बळावर भारत ‘अ’ संघाने ३ बाद ४३३ धावांचे विशाल आव्हान उभे केले. दक्षिण आफ्रिकेच्या ‘अ’ संघानेही भारताला कडवी लढत दिली. परंतु अखेरच्या षटकांमध्ये त्यांची घसरगुंडी उडाली आणि ४८.४ षटकांत त्यांचा डाव ३९४ धावांवर आटोपला. रिझा हेन्ड्रिक्स आणि वॉन व्हान जार्सव्हेल्ड यांनी शतके झळकावली. भारताकडून ईश्वर पांडेने ७६ धावांत ४ बळी घेतले.
या वर्षीच्या प्रारंभी धवनने कसोटी क्रिकेटमध्ये वादळी पदार्पण केले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने साकारलेली १८७ धावांची वादळी खेळी क्रिकेटविश्वात संस्मरणीय ठरली. त्यानंतर धवनने भारतीय फलंदाजीचा आधारस्तंभ झाला. चॅम्पियन्स करंडक एकदिवसीय स्पध्रेत विजेतेपद प्राप्त करणाऱ्या भारताच्या यशात धवनचा सिंहाचा वाटा होता. सोमवारी दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्धच्या सामन्यात हर्डस व्हिलजोएनला पहिल्याच चेंडूवर लाँग ऑनला चौकार ठोकून त्याने आक्रमणाला सुरुवात केली. व्हिलजोएनच्या वैयक्तिक दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकात तर धवनने चौकारांची हॅट्ट्रिक पेश केली. त्याने डावखुरा फिरकी गोलंदाज रॉलीफ व्हान डर मर्वेलाही चांगलाच चोप दिला.