येत्या शुक्रवारी२५ नोव्हेंबरपासून ऑकलंडमध्ये न्यूझीलंड विरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरु होत आहे. या मालिकेतील शेवटचा सामना ३० नोव्हेंबरला होणार आहे. रोहित शर्मा या दौऱ्यावर संघाचा भाग नसल्यामुळे संघाची कमान शिखर धवनच्या हाती आहे. यापूर्वी, धवनने वेस्ट इंडिज दौऱ्यावर संघाचे नेतृत्व केले होते आणि त्यानंतर जेव्हा दक्षिण आफ्रिकेचा संघ टी२० विश्वचषकापूर्वी भारतात खेळला होता, तेव्हाही धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने मालिका जिंकली होती. पण असा एक दौरा झाला जेव्हा शेवटच्या क्षणी त्याला कर्णधारपदावरून हटवून केएल राहुलकडे संघाची कमान सोपवण्यात आली. तो दौरा म्हणजे झिम्बाब्वेचा! त्यावेळी असे का करण्यात आले याची बरीच चर्चा झाली.
कर्णधारपदावरून हटवल्याबद्दल शिखर धवनचे स्पष्टीकरण
न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी पत्रकार परिषदेत त्याला झिम्बाब्वे दौर्याबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने सडेतोड उत्तर दिले. शिखर धवन म्हणाला की, “तुम्ही एक चांगला प्रश्न विचारला आहे. मी स्वत:ला भाग्यवान समजतो की माझ्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर मला संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळत आहे. हे माझ्यासाठी आव्हान आहे. आमच्याकडे तरुण खेळाडू अधिक आहेत त्यामुळे त्यांना जास्त वाव दिल्यास अधिक जास्त पर्याय संघाकडे उपलब्ध होऊ शकतात.
पुढे धवन म्हणाला, “झिम्बाब्वे दौऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास केएल राहुल आमच्या संघाचा उपकर्णधार होता, तो परत आला तेव्हा मी लक्षात ठेवले की त्याला आशिया चषकला जायचे आहे. म्हणून मी एक पाऊल मागे येत त्याला कर्णधारपद घेण्यास सांगितले. आशिया चषकादरम्यान रोहितला दुखापत झाली असती तर केएलला नेतृत्व करण्यास सांगितले असते, त्यामुळे झिम्बाब्वे दौऱ्यात त्याने सराव करणे चांगले आहे असे मला वाटले. मला याबाबत कुठलाही राग नाही किंवा मी दुखी नाही. आपल्या बाबतीत जे काही घडत असते ते सर्वकाही यौग्य असते असे मला वाटते. त्यानंतर नशिबाने दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी माझ्यावर पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे खूप आनंदी आहे.
विश्वचषक२०२३ बाबत केले भाष्य
रोहित शर्मा आणि केएल राहुलसारखे बदली खेळाडू संघासाठी डोकेदुखी ठरू शकतात का यावर धवन म्हणाला: “आम्ही काही काळापासून चांगली कामगिरी करत आहोत. त्याचवेळी माझ्याबद्दल बोलायचे तर मला कामगिरी करत राहावे लागेल. मला माहित आहे की की जोपर्यंत मी परफॉर्म करेन तोपर्यंत ते माझ्यासाठी चांगले राहील.”