अखेरच्या दिवशी रंगतदार अवस्थेत पोहचलेल्या कोलकाता कसोटीत श्रीलंकेने अंधुक प्रकाशाच्या मदतीने सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवलं. दुसऱ्या डावात भारताच्या भुवनेश्वर कुमारने टिच्चून मारा करत श्रीलंकेच्या संघाला भगदाड पाडलं. मात्र लंकेच्या संघाला ऑलआऊट करण्यात भारताला यश आलं नाही. अखेर शेवटची काही षटकं संयमीपणे खेळून काढत लंकेने पराभवाची नामुष्की टाळली. कोलकाता कसोटीनंतर बीसीसीआयने आगामी कसोटीकरता भुवनेश्वर कुमार आणि शिखर धवनला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. भुवनेश्वर कुमार हा लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे, त्यामुळे आगामी दोन कसोटी सामन्यांमध्ये तो खेळू शकणार नाही. तर शिखर धवनने वैयक्तिक कारणासाठी दुसऱ्या कसोटीतून विश्रांती देण्याची मागणी बीसीसीआयकडे केली होती. जी मागणी बीसीसीआयने मान्य केल्याचं समजतंय. २४ ते २८ नोव्हेंबरदरम्यान नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे.

अवश्य वाचा – भुवनेश्वर कुमारच्या लग्नाचा मुहूर्त ठरला, रिसेप्शनला ‘टीम इंडिया’ हजेरी लावणार

भुवनेश्वर कुमारच्या जागेवर संघात तामिळनाडूचा फलंदाज विजय शंकरला संघात स्थान देण्यात आलंय. मात्र प्रत्यक्ष सामन्यात विजय शंकरला संघात स्थान मिळण्याची शक्यता कमीच आहे. संघात मुरली विजय हा राखीव सलामीवीर असल्याने दुसऱ्या कसोटीत विजयला संघात जागा मिळेल. तर भुवनेश्वर कुमारच्या जागी इशांत शर्माला संघात जागा मिळण्याचे संकेत मिळत आहेत.

नागपूर कसोटीसाठी असा असेल भारतीय संघ –

विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), रोहित शर्मा, वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक), रविचंद्रन आश्विन, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा आणि विजय शंकर

Story img Loader