भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने सुरळीत होण्यासाठी मुंबईत आयोजित करण्यात आलेली चर्चा शिवसेनेच्या विरोधानंतर सोमवारी रद्द करण्यात आली. पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष शहरयार खान आणि कार्यकारी समितीचे अध्यक्ष निजाम सेठी यांच्या विरोधात सोमवारी सकाळी बीसीसीआय कार्यालयात घुसून शिवसैनिकांनी तीव्र निदर्शनं केली. हातात काळे झेंडे घेऊन आणि ‘शहरयार खान चले जाव’ चे फलक दाखवत ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. सुमारे १०० शिवसैनिकांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
जवळपास १५० हून अधिक शिवसैनिकांनी बीसीसीआयच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये डिसेंबरमध्ये होणा-या मालिकेसंदर्भातील चर्चेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष शशांक मनोहर यांनी शहरयार खान यांना निमंत्रण दिले होते. भारत-पाक क्रिकेट सामने सुरळीत होण्यासाठी ही चर्चा आयोजित करण्यात आली होती.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मालिका सध्याच्या घडीला संदिग्ध अवस्थेमध्ये आहे. दोन्ही देशांमधील तणावपूर्ण वातावरण पाहता राजकीय दडपणामुळे या मालिकेला हिरवा कंदील मिळत नसल्याचे म्हटले जात आहे.
या चर्चेबद्दल माहिती मिळाल्यावर शेकडो शिवसैनिक बीसीसीआयच्या कार्यालयाजवळ पोहोचले. तेथील सुरक्षाव्यवस्था तोडून त्यांनी शशांक मनोहर यांच्या कार्यालयात घुसखोरी केली. तिथे तीव्र निदर्शने आणि पाकिस्तानविरोधात घोषणा देण्यात आल्या.
दरम्यान, हा लोकभावनेचा उद्रेक होता, असा प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली. पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळू नये, अशी लोकांची भावना आहे. शिवसैनिकांनी आज जे कृत्य केले, त्याचा शिवसेनेला अभिमान आहे, असेही ते म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा