भारतीय बॉक्सिंगपटूंनी चार सुवर्णपदके जिंकून दोहा येथे झालेल्या दोहा चषक आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी केली. या सुवर्णपदकांखेरीज भारताने एक रौप्य व दोन कांस्यपदकांचीही कमाई केली.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा रौप्यपदक विजेता एल. देवेंद्रसिंग (४९ किलो), शिवा थापा (५६ किलो), मनीष कौशिक (६० किलो) व मनोजकुमार (६४ किलो) यांनी सोनेरी कामगिरी केली. गौरव बिधुरी याने ५२ किलो गटात रौप्यपदक जिंकले. मनदीप जांगरा (६९ किलो) व विकास कृष्णन (७५ किलो) यांना कांस्यपदक मिळाले.
देवेंद्रने अंतिम लढतीत फिलिपाइन्सच्या एल्ड्रेन मोरेनाला ३-० असे हरविले. गौरव याला मोन्तासार बाउली याच्याकडून १-२ असा पराभव स्वीकारावा लागला. माजी आशियाई विजेता शिवा याने अंतिम लढतीत इजिप्तच्या हीम अबेदलाल याला २-१ असे हरविले. मनीष याने अंतिम लढतीत मोरोक्कोच्या राबी हामझा याचा ३-० असा सहज पराभव केला. मनोज याने फिलिपाइन्सच्या मॅग्लीक्विआन निकोली याच्यावर
३-० याच फरकाने विजय मिळविला. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या जागतिक स्पर्धेसाठी पूर्वतयारी म्हणून भारतीय खेळाडूंनी दोहातील स्पर्धेत भाग घेतला होता.
महिलांचा सुवर्ण ठोसा
भारतीय महिलांनी एआयबीए कनिष्ठ महिला अजिंक्यपद स्पध्रेत तीन सुवर्ण आणि दोन रौप्य पदके पटकावली. सविता (५० किलो), मनदीप संधू (५२ किलो) आणि साक्षी (५४ किलो) यांनी आपापल्या गटांत जेतेपदांसह सुवर्ण जिंकले, तर सोनिया (४८ किलो) आणि निहारिका गोनेल्ला (७० किलो) यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
शनिवारी रौप्य पदकाने भारताच्या पदकांची सुरुवात झाली. पहिल्या लढतीत अमेरिकेच्या हिवेन गार्सिआने सानियावर २-१ अशी मात केली, त्यानंतर सविताने अटीतटीच्या सामन्यात युक्रेनच्या कॅटरिना रोहोवावर २-१ असा विजय साजरा करून भारताला पहिले सुवर्ण मिळवून दिले. त्यानंतर मनदीपने आर्यलडच्या निआम एर्लेयवर ३-० असा, तर साक्षीने अमेरिकेच्या यारिसेल रॅमिरेजवर ३-० असा दणक्यात विजय साजरा करून सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक साधली.
मात्र निहारिकाला रशियाच्या अनास्तासिआ सिगाइव्हाविरुद्ध सुवर्ण जिंकण्यात अपयश आले. सिगाइव्हाने ३-० अशा फरकाने विजय मिळवून निहारिकाला रौप्य पदकावरच समाधान मानण्यास भाग पाडले. तत्पूर्वी, युवा गटाच्या लढतीत जमुना बोरो (५७ किलो) हिला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागल्यामुळे तिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
भारतीय बॉक्सिंगपटूंनी शनिवारचा दिवस गाजवताना दोन विविध स्पर्धामध्ये एकूण सात सुवर्णपदकांची कमाई केली. दोहा येथे झालेल्या दोहा चषक आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत पुरुषांनी चार, तर एआयबीए कनिष्ठ महिला अजिंक्यपद स्पध्रेत तीन सुवर्णपदके पटकावली.
बॉक्सिंगपटूंचा सुवर्णपंच
भारतीय बॉक्सिंगपटूंनी चार सुवर्णपदके जिंकून दोहा येथे झालेल्या दोहा चषक आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी केली.
First published on: 24-05-2015 at 02:29 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiva manish in semifinals of doha international boxing tournament