भारताचा उदयोन्मुख खेळाडू शिवा थापा आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करणारा मनोज कुमार यांनी जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. मात्र भारताच्या थोकचोम नानाओसिंग आणि मनप्रीत सिंग यांचे आव्हान संपुष्टात आले.
सातत्यपूर्ण कामगिरीचा प्रत्यय घडवीत थापा याने अर्जेन्टिनाच्या अलबर्ट मेलियन याच्यावर २-१ अशी मात केली. थापा या १९ वर्षीय खेळाडूने आशियाई स्पर्धेत अजिंक्यपद मिळविले आहे. शिवा याला उपांत्यपूर्व फेरीत अझरबैजानच्या जाविद चालाबिजेयेव्ह याच्याशी खेळावे लागणार आहे. ही लढत जिंकल्यानंतर थापाचे पदक निश्चित होणार आहे. थापा याने २०१० मध्ये युवा ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक मिळविले होते. जागतिक कॅडेट स्पर्धेत अजिंक्यपद मिळविणाऱ्या नानाओसिंग याला ४९ किलो गटाच्या लढतीत पोर्ट रिकोचा खेळाडू अँन्थोनी चाकोन रिव्हेरा याच्याविरुद्ध ०-३ असा पराभव स्वीकारावा लागला.
सहाव्या मानांकित मनोज कुमारने कॅनडाच्या युव्स युलिसीवर २-१ असा विजय मिळवला. राष्ट्रीय प्रशिक्षक गुरबक्षसिंग संधू यांनी थापा याच्या कामगिरीचे कौतुक करीत सांगितले, त्याने चांगले कौशल्य दाखवीत विजय मिळविल्यामुळे मला समाधान झाले आहे. तो किमान कांस्यपदक मिळवील अशी मला आशा आहे. नानाओ याने जिद्दीने खेळ केला. त्याने आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूला काही चांगले ठोसे मारले, मात्र त्याची दमछाक झाली, अन्यथा त्याने विजय मिळविला असता.
मनोज कुमार पहिल्या फेरीत पिछाडीवर होता. मात्र त्यानंतर जोरदार मुसंडी मारत त्याने पुनरागमन केले. पहिल्या सत्रात मनोजने धीमा खेळ केला. पण नंतर त्याला सूर गवसला. त्याने खुपच आक्रमक खेळ केला आणि त्याने जबरदस्त वर्चस्व राखले. दुसऱ्या फेरीत त्याच्या मनोजच्या कपाळला गंभीर दुखापत झाली. पण या दुखापतीने तो खचला नाही, असे गुरबक्षसिंग संधू यांनी सांगितले.
ही लढत जिंकण्यासाठी मला खूप परिश्रम करावे लागले. निसटता विजय मिळविला असला तरी या विजयामुळे माझे मनोधैर्य उंचावणार आहे. थापा याने पुढे सांगितले, लढतीमधील पहिल्या फेरीत मी सुरुवातीला आक्रमक पवित्रा घेतला नाही. जर मी तसाच खेळलो असतो तर कदाचित मला पराभव स्वीकारावा लागला असता. पहिली फेरी माझ्या प्रतिस्पर्धी खेळाडूने घेतल्यानंतर मी उर्वरित दोन्ही फेऱ्यांमध्ये आक्रमक पवित्रा घेतला आणि विजयश्री खेचून आणली.
– शिवा थापा, भारताचा बॉक्सिंगपटू