जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी शिवा थापाची तयारी सुरू
आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारतातर्फे सर्वात कमी वयात सुवर्णपदक पटकावण्याचा मान १९ वर्षीय शिवा थापाने मिळवला. या ऐतिहासिक यशाचा आनंद साजरा करण्यात शिवा मश्गुल झालेला नाही तर आगामी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी त्याची तयारी सुरू झाली आहे.
सुवर्णपदक विजेत्या शिवासह, एल. देवेंद्रो सिंग, मनदीप जंग्रा आणि मनोज कुमार या अन्य पदकविजेत्यांचा चमूचे बुधवारी पहाटे भारतात आगमन झाले. गुणतालिकेत भारतीय संघाने दुसरे स्थान पटकावले.
प्रदीर्घ विमान प्रवासाचा कोणताही थकवा पदकविजेत्यांच्या चेहऱ्यावर जाणवला नाही, उलट या यशाने त्यांचा आनंद द्विगुणित झाल्याचे चित्र होते.
मात्र या सोनेरी यशाचा आनंद साजरा करायला वेळच नसल्याचे शिवा थापाने स्पष्ट केले. मी ३-४ दिवस आसाममधील माझ्या गावी जाणार असून, त्यानंतर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या तयारीकरता पतियाला येथे होणाऱ्या राष्ट्रीय शिबिरासाठी रवाना होणार असल्याचे त्याने सांगितले.
आनंद नंतरही साजरा केला जाऊ शकतो, मात्र जागतिक स्पर्धेत पदक पटकावण्यासाठी पुरेशी तयारी करणे आवश्यक असल्याचे त्याने सांगितले.
११ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत अल्माटी, कझाकिस्तान येथे जागतिक अजिंक्यपद स्पर्धा होणार आहे.

Story img Loader