अम्मान (जॉर्डन) : भारताच्या शिवा थापाने आशियाई अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत ६३.५ किलो वजनी गटातून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पाच वेळा आशियाई पदक विजेता असलेल्या शिवाला या वेळी मंगोलियाच्या ब्याम्बात्सोगट तुगुल्डुरचा कडवा प्रतिकार सहन करावा लागला.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत दोन्ही खेळाडूंनी सुरुवातीपासून कमालीचा आक्रमक खेळ केला. एकमेकांवर हल्ले प्रतिहल्ले चढवण्याची स्पर्धाच दोघांमध्ये सुरू होती. पंचांना लढतीचा निकाल लावतानाही तेवढाच विचार करावा लागला. अखेरीस शिवाचा अनुभव आणि वेगवान हालचाली निर्णायक ठरल्या. पंचांनी शिवाच्या बाजूने ३-२ असा कौल दिला.
अन्य लढतीत ६७ किलो वजनी गटात भारताच्या अमित कुमारने तैवानच्या झेंग रॉंग हुआंगचे आव्हान एकतर्फी लढतीत परतवून लावले. अमितची गाठ आता उझबेकिस्तानच्या मुयडन्कहुजाएव असादखुजाशी पडणार आहे. त्यापाठोपाठ ७१ किलो वजनी गटात सचिनने थायलंडच्या पीरापत यीसुन्हनोएनचा असा पराभव करून आगेकूच कायम राखली.