भारताच्या शिवा थापा (५६ किलो) व मनोज कुमार (६४ किलो) यांना जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतच पराभवास सामोरे जावे लागले. सतीश कुमारला (९१ किलोवरील) वैद्यकीय कारणास्तव स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.
आशियाई विजेता खेळाडू शिवाला अझरबैजानच्या जाविद चालाबियेव्ह याच्याकडून ०-३ असा पराभव पत्करावा लागला. मनोज कुमारला क्युबाच्या यास्निर लोपेझ याने ३-० असे हरविले. सतीश कुमारला मंगळवारी उपउपांत्यपूर्व फेरीत उजव्या डोळ्याच्या वरच्या बाजूला दुखापत झाली होती. बुधवारी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याला वैद्यकीयदृष्टय़ा लढतीसाठी अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे त्याचा प्रतिस्पर्धी माजी ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता इव्हान दिचेको याला पुढे चाल देण्यात आली.
विकास मलिक व सुमीत संगवान यांच्या पराभवामुळे भारताच्या पदकाच्या आशा संपुष्टात आल्या. ६० किलो गटात विकास याला ब्राझीलचा खेळाडू रॉब्सन कोन्सेकाओ याने ३-० असे पराभूत केले. तीनही फे ऱ्यांमध्ये विकास याला अपेक्षेइतके कौशल्य दाखविता आले नाही.
संगवान याला ८१ किलो गटात अनपेक्षित विजय मिळविता आला नाही. कझाकिस्तानचा ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता खेळाडू एबीबेक नियासिम्बेतोव्ह याने ३-० असे हरविले.
दरम्यान, शिवाने चालाबियेव्हविरुद्ध सुरुवातीस चांगले कौशल्य दाखविले. मात्र चालाबियेव्हने जोरदार चाली करत पहिली फेरी ३०-२८ अशी जिंकली. दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत शिवाने विजयासाठी आटोकाट प्रयत्न केले मात्र त्याला यश मिळाले नाही.
क्युबाचा ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता खेळाडू लोपेझ याला मनोजकुमारने चांगली लढत दिली. मात्र तीनही फेऱ्यांमध्ये लोपेझची सरशी झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा