चौथ्या मानांकित शिवा थापा (६० किलो) आणि सुमित सांगवान (९१ किलो) या भारतीय बॉक्सिंगपटूंनी आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत आपापल्या गटात रौप्यपदकाची कमाई केली. शिवाला अंतिम फेरीत दुखापतीमुळे माघार घ्यावी लागल्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले असले तरी या स्पध्रेत सलग तीन पदके पटकावणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
शिवापुढे अंतिम फेरीत स्थानिक खेळाडू एलीनूर अब्दुराईमोवचे आव्हान होते. शिवाला या लढतीमधील पहिल्या फेरीतच मोठी दुखापत झाली. पंचांनी लढत थांबविली व शिवाला लढतीवर पाणी सोडावे लागले. शिवा याने २०१३ मध्ये या स्पर्धेत सुवर्ण, तर २०१५ मध्ये त्याने कांस्यपदक जिंकले होते. शिवाने लढतीनंतर सांगितले, ‘‘मी यंदा पदक मिळवत जागतिक स्पर्धेची पात्रता पूर्ण करण्याचे ध्येय ठेवले होते. लाइटवेटमधील हे माझे पहिलेच आंतरराष्ट्रीय पदक आहे. या गटात माझी कामगिरी चांगली होईल, यात शंका वाटत होती; परंतु येथील रौप्यपदक हे माझ्यासाठी खूपच मोठे यश आहे.’’
आसामचा शिवा हा यापूर्वी बॅन्टमवेट गटात सहभागी होत असे. गतवर्षी डिसेंबरपासून तो लाइटवेट विभागात भाग घेत आहे. या नवीन वजनी गटात त्याने राष्ट्रीय स्पर्धेत अिजक्यपद पटकावले होते. त्याने येथील उपांत्य फेरीत अग्रमानांकित दोर्जियाम्बू ओतोंनदलाई याच्यावर सनसनाटी विजय नोंदवला होता. दुसरीकडे ९१ किलो वजनी गटात सुमितला कझाकस्तानच्या अव्वल मानांकित व्हॅसिली लेव्हिटकडून पराभव पत्करावा लागला. रिओ ऑलिम्पिक स्पध्रेतील रौप्यपदक विजेत्या लेव्हिटने एकहाती वर्चस्व गाजवून सुवर्णपदक नावावर केले. पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या सुमितला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
भारताच्या गौरव बिधुरी व मनीष पन्वर यांना जागतिक स्पर्धेची पात्रता पूर्ण करण्यात अपयश आले. गौरवला ५६ किलो गटात जपानच्या रियोमेई तानाकाकडून पराभव स्वीकारावा लागला. ८१ किलो गटात मनीषला पाकिस्तानच्या अवेस अली खानने पराभूत केले. या स्पर्धेतील पहिले सहा क्रमांक मिळविणाऱ्या खेळाडूंना जागतिक स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळणार आहे. गौरव व मनीष यांना पहिल्या सहा क्रमांकांमध्ये स्थान मिळवता आले नाही.