शिवाजी पार्क आणि दादर युनियन यांच्यातील सामन्यानंतर दिग्गजांच्या भावना
शिवाजी पार्क आणि दादर युनियन, मुंबईतले दोन बलाढय़ संघ. त्यांच्यातील सामने नेहमीच चुरशीचे व्हायचे. दोन्ही संघांत कमालीची खुन्नस. पण तरीही एकमेकांबद्दल अतीव आदर, प्रेम आणि मैत्री मनात असायची. या दोन्ही संघांचा मैत्रीपूर्ण सामना शनिवारी शिवाजी पार्कवर खेळवला गेला. त्या सामन्यात या साऱ्या गोष्टींची अनुभूती आलीच. दादरचा ‘लोकमान्य टिळक ब्रिज’ दोन्ही संघांना विभागणारा. पण या मैत्रीपूर्ण सामन्यांतर संघांतील दिग्गजांनी ही ‘टिळक ब्रिज’वरची मैत्री चिरंतन राहो, अशीच भावना व्यक्त केली.
शनिवारी दादर युनियन आणि शिवाजी पार्क यांच्यात मैत्रीपूर्ण सामना खेळवला गेला. सुरुवातीला हा सामना सहा षटकांचा होता. पण साऱ्यांचा उत्साह पाहून सामना ८ षटकांचा खेळवला गेला. शिवाजी पार्क जिमखान्याने ८९ धावा केल्या. दादर युनियनला अखेरच्या षटकात २४ धावांची गरज होती. पहिल्या तीन चेंडूंमध्ये दोन षटकार आणि एका चौकारासह १६ धावा आल्या, पण रंगतदार झालेल्या लढतीत अखेर शिवाजी पार्क जिमखान्याने चार धावांनी हा मैत्रीपूर्ण सामना जिंकला.
‘‘दोन्ही संघांतील सामन्यांचे ‘टिळक ब्रिज रायव्हलरी’ अशीच ओळख असायची. मैदानात दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये ईर्षां असायचीच, पण सामना संपल्यावर त्यांच्यामध्ये मैत्रीही झालेली असायची. आदर असायचा. त्यामुळे आमच्या मनात या संघांतील खेळाडूंबद्दल कधीच आकस नव्हता. आमची मैत्री यापुढेही कायम राहायला हवी,’’ असे भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांनी सांगितले.
हा स्नेह पैशानेही विकत घेता येणार नाही -गावस्कर
या दोन्ही संघांत तगडी स्पर्धा असायची. दोन्ही संघांत गुणवान खेळाडू होतेच. मैदानात असलेली खुन्नस सामन्यानंतर मनात राहायची नाही, तर त्यांच्याबद्दल नेहमीच आदर असायचा. आज आम्ही सारे प्रेमापोटीच एकत्र जमलो. त्यामुळे हा जो स्नेह आहे, तो पैशाने विकत घेता येऊच शकत नाही, असे भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी सांगितले.
दोन्ही क्लब्जची संस्कृती महत्त्वाची -माधव आपटे
हे दोन्ही संघ म्हटल्यावर पराकोटीची स्पर्धा पाहायला मिळायची. दोन्ही क्लब्जची एक शिस्त होती. त्यांच्याकडून शिकण्यासारखे बरेच होते. या शिस्तीच्या तालमीत देशाला फार मोठे क्रिकेटपटू मिळू शकले. या दोन्ही क्लब्जना एक परंपरा आहे, पण या दोन्ही क्लब्जची संस्कृती फार महत्त्वाची आहे, असे भारताचे माजी क्रिकेटपटू माधव आपटे यांनी सांगितले.
भीती नव्हती, पण दडपण होते – शिवलकर
दादर युनियनविरुद्ध खेळताना कधी भीती वाटली नाही, पण दडपण नेहमीच असायचे. या दोन्ही संघांतील एक सामना सांगतो. दादर युनियनला जिंकायला एका धावेची गरज होती. त्यांच्या फलंदाजाने चेंडू मारला. तो खेळपट्टीच्या अध्र्यावर असेल, तेव्हा क्षेत्ररक्षकाने माझ्याकडे चेंडू दिला होता. आता तो फलंदाज बाद होणार, पण माझ्यावर दडपण एवढे होते की, मी तो चेंडू यष्टय़ांना लावू शकलो नाही, असे माजी क्रिकेटपटू पद्माकर शिवलकर म्हणाले.