|| ऋषिकेश बामणे
बदलापूरमधील नवी वडवलीसारख्या छोटय़ा खेडय़ातील शिवभक्त विद्यामंदिर शाळेने ‘खो-खोपटू घडवणारी शाळा’ अशी एक विशेष ओळख निर्माण केली आहे. मुख्याध्यापक ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या पुढाकाराने शिवभक्त विद्यामंदिरात पंढरीनाथ म्हस्कर आणि नरेंद्र मेंगळ या प्रशिक्षकांनी २००४ मध्ये खो-खो खेळाडू घडवण्याची प्रक्रिया सुरू केली. तेव्हापासून गेली १५ वर्षे महाराष्ट्राला असंख्य गुणी खो-खो खेळाडूंचे योगदान या शाळेने दिले आहे.
एकाच इमारतीत असलेल्या शिवभक्त विद्यामंदिर आणि सिंड्रेला इंग्रजी माध्यम शाळेतील इच्छुक खेळाडूंना रोज सायंकाळी ४ ते ७ या वेळेत खो-खोची बाराखडी शिकवण्यात येते. शहरातील लोकांसारखे अद्ययावत तंत्रज्ञान व तंदुरुस्ती योजना येथे नसली तरी झुणका-भाकर-चटणी या तीन मूळ घटकांचा समावेश सर्व खो-खोपटूंच्या आहारात आवर्जून केला जातो. पहिलीपासूनच खेळाडूला या प्रशिक्षण केंद्रात मोफत प्रवेश आहे. याशिवाय शाळेचे विद्यार्थी नसलेल्यांनासुद्धा येथे मोफत प्रशिक्षण उपलब्ध आहे.
आजूबाजूच्या परिसरातील व शाळेचे आजी-माजी खेळाडू मिळून तब्बल १०० ते १५० मुले येथे दररोज सरावासाठी येतात. ग्रामीण भागातील या केंद्रात मुलींची संख्या अधिक असून त्यांच्याच संघाचा दबदबासुद्धा आहे. संरक्षण, आक्रमण यांसारख्या खेळातील प्रत्येक बाबीवर खेळाडूंना मार्गदर्शन करण्याबरोबरच विविध राज्यांतील दौरे असल्यास त्यांचा प्रवास आणि निवास खर्च शाळेतर्फेच करण्यात येतो.
महाराष्ट्राच्या सुवर्ण-चारचौघींचे जनक
शिवछत्रपती पुरस्कार विजेती मीनल भोईर, ईला-जानकी पुरस्कार विजेती कविता घाणेकर, राणी लक्ष्मीबाई पुरस्कार विजेती प्रियंका भोपी आणि जानकी पुरस्कार विजेती रेश्मा राठोड या चारही सुवर्णकन्या शिवभक्त विद्यामंदिरातूनच उदयास आल्या आहेत. त्याशिवाय मीनल, प्रियंका व कविताने आंतरराष्ट्रीय स्तरावरही देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. रेश्माने गतवर्षीच्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्वही केले असून गतवर्षीच झालेल्या ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेत सवरेत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार पटकावत पाच लाखांची शिष्यवृत्तीही मिळवली आहे. या स्पर्धेत कविता व प्रियंकानेही २१ वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या सुवर्णपदक विजेत्या संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
२००४ मध्ये जेव्हा या शाळेत गणित शिक्षक म्हणून माझी नियुक्ती झाली, त्या वेळी पंढरीनाथ म्हस्कर अॅथलेटिक्सचे प्रशिक्षण द्यायचे. मात्र मला खो-खोची आवड होती. त्यानुसार म्हस्कर यांना विनंती करून आम्ही मुख्याध्यापकांच्या परवानगीने येथे खो-खो खेळाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. पहिल्याच वर्षी तालुका स्तरावरील विजेतेपद, त्यानंतर २००७ मध्ये राज्यस्तरावर तीन व राष्ट्रीय स्पर्धेसाठी सहा मुलींची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली. तेथून आम्हालाही प्रेरणा मिळाली व खेळाडूंसाठी अधिकाधिक कौशल्यवान कसे बनवता येईल, याकडे आम्ही लक्ष दिले. – नरेंद्र मेंगळ, प्रशिक्षक
मॅरेथॉन व अॅथलेटिक्सचा प्रशिक्षक म्हणून मी २००० मध्ये येथे नियुक्त झालो; पण नरेंद्र मेंगळ यांच्या नियुक्तीनंतर आम्ही खो-खोवर लक्ष देण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे खो-खो हा सर्व खेळांचा पाया आहे. त्याशिवाय वर्षांखेरीस येणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी व खो-खो लीगसाठीसुद्धा आम्ही कसोशीने मेहनत घेत आहोत. खो-खोसारख्या जुन्या खेळाकडे युवा पिढी वळते आहे. त्यामुळे यापुढेही प्रत्येक खेळाडूला घडवण्यासाठी मी माझे सर्वतोपरी योगदान देईन. – पंढरीनाथ म्हस्कर, प्रशिक्षक
शिवभक्त शाळेतूनच मी खो-खोची सुरुवात केल्यामुळे पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही सरावासाठी मी येथेच येते. दररोज सायंकाळी आम्हाला काही तरी नवे शिकायला मिळते. भविष्यात आणखी आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्याचे उद्दिष्ट असून म्हस्कर-मेंगळ सरांच्या मार्गदर्शनाने मी ते नक्कीच साध्य करेन. त्याशिवाय आमच्या पालकांचा प्रशिक्षकांवर व आमच्यावर संपूर्ण भरवसा आहे. त्यामुळे कधी मुंबईच्या दिशेला किंवा महाराष्ट्राबाहेर खो-खो स्पर्धा असली तरी रात्री १२ वाजतादेखील आम्ही सुरक्षित असतो, हे आमच्या कुटुंबीयांना ठाऊक असते. देशातील इतर पालंकानीसुद्धा आपल्या मुलीला अशाचप्रकारे सहकार्य करत त्यांच्यावर विश्वास दाखवला तर नक्कीच या खेळाची व मुलींचीही प्रगती होईल. – मीनल भोईर, शिवछत्रपती पुरस्कार विजेती खो-खोपटू
rushikesh.bamne@expressindia.com