Shoaib Akhtar Criticizes ICC Promo Video: आयसीसीने गेल्या आठवड्यातच एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा अधिकृत प्रोमो लाँच केला आहे. एकदिवसीय विश्वचषक २०२३ या वेळी भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे. वर्ल्ड कपच्या प्रोमोमध्ये बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि क्रिकेट जगतातील अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला दोन मिनिटे १३ सेकंदाच्या या व्हिडीओमधून वगळण्यात आले आहे. यावर माजी खेळाडू शोएब अख्तरने प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयसीसीने जारी केलेल्या एकदिवसीय विश्वचषकाच्या प्रोमो व्हिडीओबाबत पाकिस्तानमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने बाबर आझमला विश्वचषक २०२३ च्या प्रोमोमधून बाहेर ठेवल्याबद्दल आयसीसीला फटकारले आहे. आयसीसीने जारी केलेल्या व्हिडीओचे शीर्षक ‘इट ओन्ली टेक्स वन डे’ असे आहे, ज्यामध्ये क्रिकेटचे अद्भुत क्षण एकत्र दाखवण्यात आले आहेत. या व्हिडीओला बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानने आवाज दिला आहे, ज्यामध्ये जेमिमा रॉड्रिग्स, दिनेश कार्तिक आणि शुबमन गिल यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे.

त्यांच्या व्यतिरिक्त, या प्रोमो व्हिडीओमध्ये इऑन मॉर्गन, जॉन्टी रोड्स, मुथय्या मुरलीधरन, २०१९ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार यांसारखे क्रिकेट दिग्गज देखील दाखवण्यात आले आहेत. विश्वचषकाच्या इतिहासातील काही संस्मरणीय क्षणही व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहेत. प्रोमो व्हिडिओमध्ये बाबर आझम दाखवण्यात आलेले नाही तर वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीला त्यात स्थान देण्यात आले आहे.

हेही वाचा – Emerging Asia Cup 2023: अंतिम सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान आमनेसामने, जाणून घ्या कुठे आणि कधी पाहता येणार सामना?

शोएब अख्तरने बाबरला प्रोमो व्हिडीओमधून दूर ठेवल्याबद्दल आयसीसीवर भेदभाव केल्याचा आरोप केला आहे. त्याने ट्विटमध्ये लिहले, “पाकिस्तान आणि बाबर आझमच्या महत्त्वाच्या उपस्थितीशिवाय विश्वचषकाचा प्रोमो पूर्ण होईल असे ज्याला वाटले, त्याने खरं तर स्वतःला एक विनोद म्हणून सादर केले आहे. चला मित्रांनो, आता मोठे होण्याची वेळ आली आहे.”

१५ ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान संघांत होणार सामना –

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये, भारत आणि पाकिस्तानचे संघ १५ ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमनेसामने असतील. एकदिवसीय विश्वचषक २०२३ ची सुरुवात ५ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील सामन्याने होईल, तर अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shoaib akhtar criticizes iccs exclusion of babar azam from world cup 2023 promo video vbm