Shoaib Akhtar Shocking Video Of IND vs PAK: आशिया चषकाच्या सुपर चार टप्यातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात बाबर आझमच्या संघाचा दारुण पराभव झाला. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने या पराभवानंतर भारताचे कौतुक करत व्हिडीओ पोस्ट केला. विराट कोहली, कुलदीप यादव, के. एल राहुल, बुमराह यांचं कौतुक करताना अख्तरने “पाकिस्तानला एका मॅचने खेळातून बाहेर टाकता येणार नाही, पाकिस्तान सुद्धा नक्कीच पुनरागमन करेल” अशा विश्वास व्यक्त केला होता. एकीकडे शोएब अख्तरचा हा व्हिडीओ सुद्धा चर्चेत असताना एका जुन्या मुलाखतीचा व्हिडीओ सुद्धा अनेकांच्या भुवया उंचावत आहे. क्रिकेट हा जेंटलमॅन गेम म्हणून ओळखला जात असताना अख्तरने या व्हिडिओमध्ये स्वतःच्या चुकीबद्दल अभिमानाने सांगणं अनेकांना पटलेलं नाही. नेमकं हे प्रकरण काय, जाणून घेऊया..
रविवारी (10 सप्टेंबर), शोएब अख्तरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला ज्यामध्ये तो माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला जीवघेणी दुखापत करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याची कबुली देत होता. विशेष म्हणजे हे सांगताना अख्तरचा सूर स्वतःचं कौतुक करत असल्याचा भासत होता.
अख्तर म्हणाला की, “मी आज हे स्पष्टपणे सांगत आहे की, एका सामन्यात मला खरोखरच सचिनला दुखापत करायची होती, मी तोच प्रयत्न करत होतो, कोणत्याही किंमतीत त्याला दुखावण्याचा माझा निश्चय होत. इंझमाम-उल-हकने तेव्हा विकेट्ससमोर गोलंदाजी करण्यास सांगितले तरीही मी माझा प्रयत्न चालूच ठेवला. मी जाणूनबुजून त्याच्या हेल्मेटवर चेंडू मारले. जेव्हा त्याला लागलं तेव्हा तर तो (सचिन) मेलाच असेल असं मला वाटलं पण, मी रिप्ले पाहिला आणि कळलं की चेंडू त्याच्या कपाळावर आदळला…मग मी त्याला दुखापत करण्याचा पुन्हा प्रयत्न केला.”
शोएब अख्तर २००६ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात नॅशनल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याबद्दल बोलत होता. जून २०२२ मध्ये स्पोर्ट्सकीडाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान हे वादग्रस्त दावे केले होते. आणि आता कालच्या भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप सामन्याच्या नंतर मुलाखतीची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
दरम्यान, पाकिस्तानच्या माजी वेगवान गोलंदाजाने सामन्यादरम्यान भारतीय खेळाडूंना जाणूनबुजून दुखावल्याची कबुली देण्याची ही पहिलीच वेळ नाही. ऑक्टोबर २०२१ मध्ये स्पोर्ट्स टॉकशी बोलताना, शोएब अख्तरने कबूल केले की २००६ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील फैजलाबाद कसोटी सामन्यादरम्यान त्याने महेंद्रसिंग धोनीला जाणूनबुजून ‘बीमर’ टाकला होता.
पाकिस्तानी वेगवान गोलंदाज म्हणाला, “फैसलाबादमध्ये धोनीबाबत मी हीच चूक केली होती. मी जाणूनबुजून त्याच्यावर बीमर फेकला होता. धोनी एक चांगला माणूस आहे आणि मी त्याचा आदर करतो. मला त्याचं खूप वाईट वाटलं . जर चेंडू धोनीला लागला असता तर २००५ मध्येच त्याला गंभीर दुखापत झाली असती.
Video: शोएब अख्तरने दिली कबुली
हे ही वाचा<< IND vs PAK: “भारत जिंकला तरी एका मॅचने तुम्ही पाकिस्तानला..”, शोएब अख्तरने Video मधून करून दिली आठवण
बीमर गोलंदाजी म्हणजे काय?
क्रिकेट सामन्यादरम्यान बीमर गोलंदाजी करणे बेकायदेशीर आहे. या प्रकारात गोविन्दाजाने चेंडू उंच फेकल्यामुळे चेंडू उसळत नाही चेंडूमुळे फलंदाजाच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत होण्याची शक्यता असते. असे बीमर चुकून टाकले जातात. पण संभाव्य परिणामांची पूर्ण जाणीव असूनही अख्तरने हे जाणूनबुजून केले. अशावेळी आधी नो बॉल दिला जातो आणि गोलंदाजाला सूचित केले जाते. सामन्यादरम्यान गुन्ह्याची पुनरावृत्ती केल्यास त्याला उर्वरित सामन्यात गोलंदाजी करण्यापासून रोखले जाऊ शकते.