रावळपिंडी एक्स्प्रेस नावाने प्रसिद्ध असलेला पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर नेहमी चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून तो पाकिस्तानच्या सरकारी चॅनेलवरील कार्यक्रमादरम्यान अँकरसोबत झालेल्या वादामुळे चर्चेत आहे. या वादासाठी, पाकिस्तान टेलिव्हिजन कॉर्पोरेशन (PTVC) ने त्याच्यावर १०० मिलियन म्हणजेच १० कोटींचा मानहानीचा दावा केला आहे.
या दाव्यानंतर शोएब अख्तरने आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ”पीटीव्हीच्या या कृतीमुळे मी खूप निराश आहे. पण मी लढवय्या आहे, मी हार मानणार नाही आणि या कायदेशीर लढाईला सामोरे जाईन. आता माझे वकील सलमान खान नियाझी या प्रकरणी कोर्टात उत्तर देतील.”
पीटीव्हीने शोएब अख्तरला मानहानीसाठी १० कोटी रुपयांव्यतिरिक्त त्याचे तीन महिन्यांचे वेतन म्हणजेच ३३,३३,००० रुपये देण्यास सांगितले आहे. त्यांनी ही रक्कम न भरल्यास अख्तर यांच्यावर न्यायालयात कायदेशीर कारवाई केली जाईल, असे चॅनेलने म्हटले आहे.
”कलम २२ नुसार, दोन्ही पक्षांना ३ महिन्यांची लेखी नोटीस देऊन किंवा त्याऐवजी पैसे देऊन त्यांचा करार संपुष्टात आणण्याचा अधिकार आहे. शोएब अख्तरने २६ ऑक्टोबर रोजी ऑन एअर राजीनामा दिला होता, त्यामुळे पीटीव्हीचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. शोएबने टी-२० विश्वचषकाच्या प्रसारणादरम्यान पीटीव्ही व्यवस्थापनाला माहिती न देता दुबई सोडले. त्याचवेळी त्याने भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंगसोबत भारतातील एका वाहिनीवरील टीव्ही शोमध्ये हजेरी लावून पीटीव्हीचे खूप नुकसान केले आहे.”, असे चॅनेलने आपल्या नोटीसमध्ये म्हटले.
नक्की काय झाले?
शोएब अख्तरला सर व्हिव्हियन रिचर्ड्स आणि डेव्हिड गॉवर सारख्या जागतिक क्रिकेट महान व्यक्तींसोबत पीटीव्हीने टी-२० विश्वचषकातील पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कामगिरीवर चर्चा करण्यासाठी आमंत्रित केले होते. राष्ट्रीय संघात शाहीन आफ्रिदी आणि हारिस रौफच्या वाढीची चर्चा सुरू असताना, अख्तरला अँकर नौमान नियाज यांनी अडवले.
व्यत्यय आल्याने अख्तर नाराज झाला आणि त्याने असंतोष व्यक्त केल्यामुळे, होस्टने त्याला हवे असल्यास शो मधेच सोडण्याची ऑफर दिली. “तुम्ही थोडे उद्धट आहात आणि मला हे सांगायचे नाही: पण जर तुम्ही जास्त अतिहुशार असाल तर तुम्ही जाऊ शकता. मी हे ऑन एअर सांगत आहे”, नियाजने अख्तरला हे सुनावले. त्यानंतरची ही व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.