आगामी आशिया चषक स्पर्धेत २८ ऑगस्ट रोजी भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. त्या सामन्याची आतापासूनच चर्चा रंगली आहे. क्रीडा वाहिन्यांनी आशिया चषकाच्या पार्श्वभूमीवर विशेष कार्यक्रम सुरू केले आहेत. अशाच एका कार्यक्रमामध्ये पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने एक धक्कादायक खुलासा केला आहे. १९९९मध्ये मोहालीमध्ये झालेल्या एकदिवसीय सामन्याबाबत हा खुलासा आहे.
स्टार स्पोर्ट्सने आपल्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ‘फ्रेनेमीज’ या नावाने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आणि भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग एकमेकांशी चर्चा करताना दाखवले आहेत. या संभाषणामध्ये शोएबने १९९९मध्ये मोहालीत झालेल्या एकदिवसीय सामन्यात सौरव गांगुलीला टाकलेल्या जीवघेण्या चेंडूबद्दल सांगितले आहे.
हेही वाचा – हरभजन सिंगला पाकिस्तानकडून मिळायच्या भेटवस्तू! भज्जीने स्वत: केला खुलासा
रावळपिंडी एक्स्प्रेस नावाने प्रसिद्ध असलेल्या अख्तरने सांगितले की, सामन्यापूर्वी पाकिस्तान संघाच्या बैठकीत त्याला भारतीय फलंदाजांचे डोके आणि बरगड्यांना लक्ष्य करण्यास सांगितले होते. त्यामध्ये गांगुलीचे नाव आघाडीवरती होते. शोएब म्हणाला, “आम्ही गांगुलीच्या बरगड्यांना लक्ष्य करण्याचा निर्णय घेतला होता. आमच्या संघाच्या बैठकीमध्ये मला सांगण्यात आले होते की, फलंदाजांना बाद करायचे नाही. गतीचा वापर करून त्यांना चेंडूने जायबंदी करायचे.”
१९९९मध्ये मोहाली येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यात शोएब अख्तरने टाकलेल्या शॉर्ट-पिच चेंडूमुळे गांगुलीच्या बरगड्यांवर मार लागला होता. जखमी झाल्यामुळे गांगुलीला मैदानातून बाहेर पडावे लागले होते.
दरम्यान, मैदानावर कट्टर प्रतिस्पर्धी असूनही, अख्तर आणि गांगुली दोघेही आता चांगले मित्र आहेत. इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात शोएब गांगुलीच्या नेतृत्वाखाली खेळला होता.