दिग्गज माजी भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरने दोन दशकांपेक्षाही जास्त काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर अधिराज्य गाजवले. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये त्याने शेकडो गोलंदाजांचा सामना केला. त्याने आपल्या बॅटच्या सहाय्याने अनेक गोलंदाजांची पिसे काढली. दिवंगत ऑस्ट्रेलियन गोलंदाज शेन वॉर्नने तर सचिन स्वप्नातही आपल्याला छळतो, अशी जाहीर कबुली दिली होती. तंत्रशुद्ध फलंदाजी करणाऱ्या सचिनला बाद करण्यासाठी किंवा त्याला विचलित करण्यासाठी गोलंदाज आपापल्यापरीने प्रयत्न करायचे. अशा गोलंदाजांमध्ये माजी पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचाही समावेश होता. शोएब अख्तरने स्वत: याबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे.
‘एका कसोटी सामन्यात आपण सचिनला जाणीवपूर्वक जखमी करण्याच्या प्रयत्नात होतो,’ अशी कबुली पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने दिली आहे. स्पोर्ट्सकीडा या क्रीडा वेबसाईटशी गप्पा मारताना शोएबने हा किस्सा सांगितला आहे. २००६ मध्ये भारताय क्रिकेट संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. त्या दौऱ्यातील तिसरा कसोटी सामना कराची येथे खेळवण्यात आला होता. त्यावेळी शोएब अख्तर आपल्या जबरदस्त वेगासाठी आणि आक्रमकपणासाठी ओळखला जात असे. आपल्या याच गुणांचा वापर करून तो सचिन तेंडुलकरला जखमी करू इच्छित होता.
याबाबत शोएब म्हणाला, “मी पहिल्यांदाच हे जाहीरपणे सांगत आहे. त्या कसोटी सामन्यात मला जाणूनबुजून सचिनला मारायचे होते. सचिनला कोणत्याही किंमतीत जखमी करण्याचा मी निश्चय केला होता. तत्कालीन कर्णधार इंझमाम मला सरळ विकेट्ससमोर गोलंदाजी करण्यास सांगत होता. पण, मला तर सचिनला मारायचे होते. म्हणून मी त्याला त्याच्या हेल्मेटवर चेंडू मारले. त्यानंतर मला आनंदही झाला होता. पण, जेव्हा मी पुन्हा व्हिडिओ पाहिला तेव्हा मला दिसले की सचिन त्याचे डोके वाचवण्यात यशस्वी झाला होता.”
अख्तरने पुढे सांगितले की, तो तेंडुलकरला जखमी करण्याच्या प्रयत्नात असताना वेगवान गोलंदाज मोहम्मद आसिफने भारतीय फलंदाजांना त्रास देण्यास सुरुवात केली होती. त्याच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजीचा टिकाव लागला नाही. कराचीतील कसोटी सामन्यात सचिनला पहिल्या डावात अब्दुल रझाकने २३ धावांवर आणि दुसऱ्या डावात आसिफने २६ धावांवर बाद केले होते. भारताने ही लढत ३४१ धावांनी गमावली होती.