जागतिक क्रिकेटमध्ये नेहमीच पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व राहिले आहे. संघाचा समतोल कधीकधी ढासळलेला असला, तरी पाकिस्तानकडे वेगवान गोलंदाजांचा समृद्ध विभाग होता. सध्याही या संघात हसन अली आणि शाहीन आफ्रिदीसारखे उत्कृष्ट वेगवान गोलंदाज आहेत. आता शोएब अख्तरने पाकिस्तानात एकामागून एक वेगवान गोलंदाज येण्यामागे काही कारणे दिली आहेत. इथल्या लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी, परिस्थिती या घटकांचा समावेश वेगवान गोलंदाज असण्याला कारणीभूत ठरतो, असा तर्क अख्तरने लावला.
शोएब अख्तर म्हणाला, “पाकिस्तानमध्ये अधिक वेगवान गोलंदाज असण्यामागे अन्न, वातावरण आणि वृत्ती यासारखे घटक काम करतात. यासोबतच माझ्यासारखे उर्जेने भरलेले लोक आहेत. वेगवान गोलंदाजी करण्यात आम्हाला आनंद मिळतो. मग तुम्ही जे खाता तसे बनता. माझा देश भरपूर जनावरे खातो आणि आम्ही जनावरांसारखे बनतो. वेगवान गोलंदाजीचा विचार केला, तर आम्ही सिंहासारखे धावतो.”
हेही वाचा – IND vs WI : हिरमोड..! वनडे मालिकेपूर्वी समोर आली निराशादायक बातमी; वाचा नक्की झालं काय?
शोएब अख्तरने ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीशी संवाद साधताना या गोष्टी सांगितल्या. क्रिकेटमध्ये हे दोन्ही खेळाडू एकाच कालावधीत वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध होते. अलीकडेच हे दोन्ही क्रिकेटपटू ओमानमध्ये खेळल्या गेलेल्या लेजेंड्स क्रिकेट लीगचा भाग होते. ब्रेट ली वर्ल्ड जायंट्सकडून खेळत असताना शोएब अख्तर एशिया लाइन्सचा भाग होता. या लीगच्या अंतिम सामन्यात वर्ल्ड जायंट्सने एशिया लायन्सचा पराभव करत विजेतेपद जिंकले. या लीगमध्ये भारताचा संघ ‘इंडिया महाराजास’चाही समावेश होता.