Shoaib Akhtar on Babar Azam: पाकिस्तानचा दिग्गज वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने मेन इन ग्रीन कर्णधार बाबर आझमच्या संभाषण कौशल्यावर टीका केली आहे. शोएब अख्तर म्हणाला की बाबर इंग्रजी बोलू शकत नसल्याने तो मोठा ब्रँड बनू शकला नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान गोलंदाजीचा विक्रम करणाऱ्या ४७ वर्षीय वेगवान गोलंदाजाने सांगितले की, क्रिकेट खेळणे एक गोष्ट आहे आणि मीडिया हाताळणे ही दुसरी गोष्ट आहे. जर बाबर बोलू शकत नसेल तर तो व्यक्त होऊ शकणार नाही.

एका स्थानिक पाकिस्तानी चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत शोएब अख्तरने बाबरसह पाकिस्तानी खेळाडूंच्या संवाद कौशल्यावर टीका केली.तो म्हणाला, “तुम्हीच बघा, संघात चारित्र्य नाही, त्यांना कसं बोलावं हेही कळत नाही. ते सादरीकरणाला आले की किती विचित्र वाटतं. इंग्रजी शिकणे आणि बोलणे किती कठीण आहे? क्रिकेट मीडिया हाताळणे हे एक काम आहे. तुम्ही बोलू शकत नसाल तर मला माफ करा, पण तुम्ही टीव्हीवर व्यक्त होऊ शकणार नाही.”

शोएब अख्तर म्हणाला, “मला उघडपणे सांगायचे आहे की बाबर आझम हा पाकिस्तानमधील सर्वात मोठा ब्रँड असावा, पण तो पाकिस्तानमधील सर्वात मोठा ब्रँड का बनला नाही? कारण त्याला बोलता येत नाही.” त्याच्या मते, वसीम अक्रम आणि शाहिद आफ्रिदी यांसारख्या माजी दिग्गजांसह जाहिरातींसाठी सध्याच्या क्रिकेटपटूंपेक्षा त्यांना प्राधान्य दिले जाते. याच्या मागचे एकमेव कारण म्हणजे त्याचे संवाद कौशल्य आहे.

बाबर आझमला याआधीही त्याच्या संवाद कौशल्यामुळे टीकेला सामोरे जावे लागले आहे. २०२० मध्ये एका पत्रकार परिषदेदरम्यान, त्याला त्याच्या इंग्रजी भाषेच्या कौशल्याबद्दल विचारण्यात आले होते. ज्यावर त्याने उत्तर दिले होते की, तो आपले संभाषण कौशल्य सुधारण्यासाठी काम करत आहे.

हेही वाचा – Women’s T20 World Cup: स्मृती मंधानाच्या झंझावाती खेळीने लावली विक्रमांची रांग; महिला क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच ‘हे’ घडले

बाबर आझम म्हणाला होता,”मी एक क्रिकेटपटू आहे; माझे काम क्रिकेट खेळणे आहे. मी काही ‘गोरा’ नाही ज्याला इंग्रजी चांगले येते. होय, मी त्यावर काम करत आहे, परंतु तुम्ही या गोष्टी वेळेनुसार शिकाल; तुम्ही अचानक ते शिकू शकत नाही.”