India vs Pakistan, World Cup 2023 Match Updates: शनिवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचा सर्वात मोठा सामना होणार आहे. दोन्ही संघांनी विश्वचषकात दमदार सुरुवात केली आहे. दोन्ही देशांनी पहिले दोन सामने जिंकले आहेत. आता दोघांची नजर विजयाच्या हॅट्ट्रिकवर असेल. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारत-पाकिस्तान सामन्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. शोएब अख्तर म्हणाला की, हा सामना कमकुवत ह्रदयाच्या लोकांसाठी नाही.
विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने आपली प्रतिक्रिया दिली. रेव्हस्पोर्ट्शी बोलताना शोएब अख्तर म्हणाला, “जर तुम्ही धाडसी असाल, तर तुम्ही भारत-पाकिस्तान सामन्याचा पुरेपूर आनंद घ्याल. जर तुम्ही घाबरट असाल, तर मग हा सामना कमकुवत ह्रदयाच्या लोकांसाठी नाही. ही स्पर्धा अशा लोकांसाठी किंवा खेळाडूंसाठी आहे, ज्यांना स्वतःसाठी मोठे नाव हवे आहे. स्वत:ला सुपरस्टार बनवायचे आहे.”
तेव्हा आमच्यावरचा दबाव हटला जातो –
माजी पाकिस्तानी वेगवान गोलंदाजाने स्पष्ट केले की पाकिस्तान संघ भारताइतका दबावाखाली का येणार नाही. भारत-पाकिस्तान सामन्यात टीम इंडियाला विजयाचा प्रबळ दावेदार मानणे, खरे तर पाकिस्तान संघाला मदत करते, असे तो म्हणाला. शोएब अख्तर म्हणाला, “गेल्या वर्षी मी दुबईत होतो. मी एका भारतीय वाहिनीवर शो करत होतो. त्या चॅनलवर फक्त एकच गोष्ट बोलली जात होती की टीम इंडिया पाकिस्तानला चिरडून टाकेल. असा दबाव कोण निर्माण करतो? जेव्हा तुम्ही पाकिस्तानला कमकुवत संघ म्हणता, तेव्हा आमच्यावरचा दबाव हटला जातो. त्यामुळे आमच्याकडे गमावण्यासारखे काही नाही.”
आक्रमक आणि हुशारीने खेळले पाहिजे –
भारताला घरच्या मैदानावर पराभूत करून विश्वचषक जिंकण्यासाठी अख्तरने बाबर आझमच्या संघाला पाठिंबा दिला. पाकिस्तानचा हा माजी वेगवान गोलंदाज म्हणाला की, “मला विश्वास आहे की पाकिस्तानला तिथे जाऊन भारताला पराभूत करणे सोपे जाईल. कारण प्रायोजक आणि टीव्ही अधिकारांचा दबाव तुमच्यावर असेल, आमच्यावर नाही. बाबर आझम आणि त्याच्या संघाने आक्रमक आणि हुशारीने खेळले पाहिजे. तुम्ही भारताला हरवून अहमदाबादमध्ये फायनल खेळा. मी तुमच्या बरोबर आहे.”