Shoaib Akhtar Asia Cup 2023: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने आशिया चषकाच्या सुपर ४ सामन्यात भारताने जाणूनबुजून श्रीलंकेच्या विरुद्ध खराब खेळाचे प्रदर्शन केल्याचे सांगणारे कॉल येत असल्याचे सांगितले आहे. अख्तरने एका व्हिडिओमध्ये असं सांगितलं की, “भारताने गेम फिक्स केला आहे” आणि आशिया कपमधून पाकिस्तानला काढून टाकण्यासाठी जाणूनबुजून श्रीलंकेविरुद्ध हरण्याचा डाव रचला होता,” असा दावा करणारे मेसेज आणि कॉल्स येत आहेत. भारताने पाकिस्तानला २२८ धावांनी धूळ चारल्यानंतर, फायनलमध्ये पात्र होण्याची अधिक चांगली संधी मिळावी यासाठी भारताने सुपर ४ सामन्यात श्रीलंकेचा पराभव करणे आवश्यक होते. पण २० वर्षीय ड्युनिथ वेललागेच्या अप्रतिम अष्टपैलू प्रदर्शनामुळे श्रीलंकेने भारतावर खूप दबाव टाकला होता.
ड्युनिथने शुबमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल आणि हार्दिक पंड्याला बाद करून भारताला मोठा धक्का दिला. भारताला २१३ धावांत गुंडाळून त्याने पहिले पाच बळी घेतले. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी पॉवरप्लेमध्ये श्रीलंकेच्या तीन विकेट्स घेतल्याने भारताने बॉलसह जोरदार पुनरागमन केले, कुलदीप यादवने मधल्या फळीभोवती जाळे फिरवले. कुलदीप, हार्दिक आणि रवींद्र जडेजा यांनी गोलदांजीत आपलं बळ दाखवून श्रीलंकेचा डाव १७२ धावांत गुंडाळला आणि सामना ४१ धावांनी जिंकला.
मात्र अख्तरने वेललागेच्या प्रामाणिक प्रयत्नांचं कौतुक केलं आणि भारताच्या वाईट सुरुवातीशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले. “तुम्हाला काय म्हणायचंय मला कळत नाहीये. मला ‘भारताने गेम फिक्स केला आहे’ असे मीम्स आणि मेसेज येत आहेत, पाकिस्तानला आशिया कप मधून बाहेर काढण्यासाठी भारत मुद्दाम हरत आहे. तुम्ही ठीक आहात का? श्रीलंकेने जीव तोडून गोलंदाजी केली. तुम्ही तो २० वर्षांचा मुलगा पाहिला का? त्याने ४३ धावा केल्या आणि ५ विकेट्स घेतल्या. मला भारत आणि इतर देशातुन फोन येत आहेत की, भारत जाणूनबुजून हरत आहे.”
अख्तर म्हणाले की, “भारताने श्रीलंकेचा सामना हलक्यात घेतला असं म्हणताच येणार नाही कारण त्यांना फक्त स्वतःसाठी अंतिम फेरीत जागा निश्चित करण्यासाठी जिंकणे आवश्यक होते.”
हे ही वाचा<< आशिया चषकाच्या फायनलमध्ये पुन्हा IND vs PAK? श्रीलंका पॉईंट टेबलमध्ये पुढे पण..अशी आहेत गणितं
दरम्यान, सुपर ४ चे दोन्ही सामने जिंकणारा भारत हा एकमेव संघ आहे. दोन पराभवानंतर बांगलादेश आधीच स्पर्धेबाहेर आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात आता शुक्रवारी कोलंबोमध्ये बाद फेरीचा सामना होणार आहे. भारत अगोदरच अंतिम फेरीत दाखल झालेला आहे. आता पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामन्यात जो संघ जिंकेल तो भारतासह अंतिम फेरीत दाखल होईल.