Shoaib Akhtar Statement on ICC: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर हा आतापर्यंतचा क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान गोलंदाज आहे. शोएब अख्तर त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जात असे, ज्यासमोर मोठे फलंदाजही फ्लॉप व्हायचे. त्याचवेळी, आता अख्तर त्याच्या विचित्र विधानांमुळे चर्चेचा विषय ठरला आहे. त्याने आयसीसीवरही मोठं घणाघाती वक्तव्य करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
शोएब अख्तरने हल्लीच असा दावा केला आहे की, जर त्याला शक्य असेल तर तो स्वत:चा सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा त्याचा विक्रम अवघ्या ६ महिन्यांत मोडू शकतो. याशिवाय त्याने आयसीसीला त्याचे पाय धुवून पाणी प्यावे असंही सांगितले आहे.
शोएब अख्तर नुकताच TNKS Podcast मध्ये दिसला होता. या यूट्यूब शोवर, शोएब अख्तरला जेव्हा विचारण्यात आले की त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान चेंडूचा विक्रम कोणी मोडू शकेल का? या प्रश्नाचं उत्तर देताना अख्तर म्हणाला, “मला वाटतं असं होऊ शकतं. जर मी जगभरातून गोलंदाज गोळा केले तर हा विक्रम ६ महिन्यांत मोडता येईल असे मला वाटते. जगभरातून दोन-तीन हजार खेळाडू गोळा करण्यात मला यश आले तर मी माझा विक्रम मोडेन. युवा खेळाडू १६०-१७० किमी प्रति तास वेगाने गोलंदाजी करू शकतात.”
हेही वाचा – VIDEO: गुकेशने विश्वविजेतेपदानंतर कोचला दिलेलं वचन केलं पूर्ण, भीतीवर विजय मिळवत केलं थरारक बंजी जंपिंग
पुढे अख्तर म्हणाला, “जर तसं झालं नाही तर मी तुम्हाला १५०, १४० आणि १४५ किलोमीटर प्रतितास या वेगाने गोलंदाजी करणारे वेगवान गोलंदाज देईन. मग भारत-पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश त्यांना संधी देतात की नाही, हा त्यांचा निर्णय आहे.”
तो पुढे म्हणाला, “खेळाडूंना खेळवण्यासाठी मी मतदान घेईन. लोक मतदान करतील आणि कोणाला खेळायला द्यायचे आणि कोणाला नाही हे चाहते सांगतील. कोणीतरी येऊन माझा विक्रम मोडावा अशी माझी इच्छा आहे. फक्त एक चेंडू टाकायचा आहे. जगाला १५० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करू शकणारे गोलंदाज भारत, पाकिस्तान व बांगलादेशला मिळत असतील तर आयसीसीने माझे पाय धुवून पाणी प्यावं.”
शोएब अख्तरने २००३ च्या विश्वचषकादरम्यान सर्वात वेगवान गोलंदाजीचा विक्रम केला होता. या स्पर्धेदरम्यान त्याने इंग्लंडविरुद्ध १६१.३ किलोमीटर प्रतितास वेगाने चेंडू टाकला. क्रिकेटच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात वेगवान चेंडू आहे. म्हणजेच गेल्या २१ वर्षांपासून हा विक्रम एकाही गोलंदाजाला मोडता आलेला नाही. त्याच्या वेगामुळे अख्तर यशस्वी गोलंदाज ठरला. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने पाकिस्तानसाठी २२४ सामन्यांत ४४४ विकेट घेतले.