पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरकडे एक इच्छा व्यक्त केली आहे. सचिन आणि शेन वॉर्न सुरू करत असलेल्या ‘क्रिकेट ऑल स्टार’ मालिकेत सचिनने आपल्याला त्याच्या संघात स्थान द्यावे, अशी विनंती शोएबने केली आहे.
सचिन तेंडुलकर आणि शेन वॉर्न यांच्या नेतृत्त्वात न्यूयॉर्कमध्ये माजी क्रिकेटपटूंचा समावेश असलेली क्रिकेट ऑल स्टार ही ट्वेन्टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे. त्यासाठी ‘सचिन ब्लास्टर्स’ आणि ‘वॉर्न वॉरिअर्स’ असे दोन संघ तयार करण्यात आले आहेत. ‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ म्हणून ओळख असलेल्या शोएब अख्तर देखील या मालिकेत खेळणार असून त्याने सचिनच्या संघात खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
मी आजवर सचिनच्या विरोधात खेळत आलो. सचिन आणि माझ्यातील लढत आजवर क्रिकेट चाहत्यांनी अनुभवली आहे. भारतीय चाहत्यांना आम्ही दोघांनी पुन्हा एकदा एकमेकांविरुद्ध खेळताना पाहण्याची इच्छा आहे, हे मी समजू शकतो पण आता त्याच्यासोबत खेळण्याचा अनुभव घेण्याची माझी इच्छा आहे. म्हणून सचिनला माझी विनंती आहे की त्याने मला त्याच्या संघात घ्यावे, असे शोएब म्हणाला.
दरम्यान, क्रिकेट ऑल स्टार मालिकेत एकूण ३० माजी क्रिकेटवीर खेळताना पाहायला मिळणार आहेत. अमेरिकेत क्रिकेटचा प्रसार व्हावा या उद्देशातून या मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. यात सचिन, शेन वॉर्नसह रिकी पाँटींग, वीरेंद्र सेहवाग, सौरभ गांगुली, मॅथ्यू हेडन, ब्रायन लारा, वसिम अक्रम, ग्लेन मॅग्रा, अॅलन डोनाल्ड या दिग्गजांचा समावेश आहे.