Sourav Ganguly Reply to Shoaib Akhtar: माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी प्रमुख सौरव गांगुली आणि विराट कोहली यांच्यात भलेही विळा-भोपळ्याचे नाते असेल, पण दोघांचेही ध्येय एकच आहे ते म्हणजे भारताला क्रिकेटचा विश्वचषक जिंकवून देणे. गांगुलीने २००० ते २००५ या काळात कर्णधार म्हणून हे काम केले होते, पण तो २००३ साली विश्वचषक जिंकवून देण्यात अपयशी ठरला होता. टीम इंडियाचा फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने दारूण पराभव केला होता. हेच कोहलीने २०१५ ते २०२१ या काळात हे केले. काही गोष्टींवर त्यांचे एकमत नव्हते, पण याचा अर्थ असा नाही की जर कोणी कोहलीवर टीका केली तर गांगुली ऐकेल आणि उत्तरही देणार नाही. क्रिकेट ते क्रीडा राजकारणापर्यंत प्रसिद्ध असलेल्या गांगुलीने विराट कोहलीच्या मर्यादित षटकांतून निवृत्ती घेण्याच्या वक्तव्यावर शोएब अख्तरला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
कोहली ५० षटकांच्या विश्वचषकात सहभागी होण्याची शक्यता असल्याने, माजी पाकिस्तानी वेगवान गोलंदाजाचे मत आहे की विराटने आपली कसोटी कारकीर्द अधिक बळकट करण्यासाठी एकदिवसीय आणि टी२० या दोन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती घ्यावी. ‘बॅकस्टेज विथ बोरिया’ या शोमध्ये अख्तरने सांगितले होते की, “कोहली एकदा वन डे आणि टी२० सामन्यांमधून बाहेर पडल्यानंतर त्याचे सर्व लक्ष आणि ऊर्जा कसोटी क्रिकेटवर केंद्रित करू शकतो. यामुळे तो अनेक वर्षे क्रिकेट खेळू शकतो आणि सचिन तेंडुलकरचा १०० शतकांचा विक्रम मागे टाकू शकतो.”
शोएब पुढे म्हणाला, “मला वाटत नाही की या विश्वचषकानंतर कोहलीने ५० षटकांचे अधिक सामने खेळावेत. याशिवाय तो टी२० मध्येही फारसा दिसत नाही. मला वाटते की त्याने आणखी सहा वर्षे तरी खेळावे. सचिन तेंडुलकरच्या १०० शतकांचा विक्रम मोडण्याची क्षमता कोहलीत आहे. या विश्वचषकानंतर त्याने कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि हा विक्रम मोडला पाहिजे.”
सौरव गांगुलीने शोएब अख्तरला चोख प्रत्युत्तर दिले
शोएबच्या या विधानाबाबत गांगुलीला विचारले असता त्याने सडेतोड उत्तर दिले. त्याच्या उत्तराने अख्तर नि:शब्द झाला. भारताच्या माजी कर्णधाराला अख्तरच्या मूल्यांकनात कोणतेही तर्क सापडले नाहीत आणि त्याने कोहलीला हवे त्या फॉरमॅटमध्ये खेळण्याचे समर्थन केले. तो म्हणाला, “का? विराट कोहलीने त्याला जे क्रिकेट खेळायचे आहे ते खेळावे कारण तो परफॉर्म करतो. विराटला कोणत्याही फॉरमॅटमधून माघार घेण्याची गरज नाही.”
कोहलीची कसोटी कामगिरी शानदार आहे यात शंका नाही, ज्यामुळे तो आधुनिक काळातील महान खेळाडूंच्या यादीमध्ये समाविष्ट होऊ शकतो. मात्र, त्याच्या एकदिवसीय कामगिरीच्या तुलनेत ते कमी नाही. त्याने सध्या १११ कसोटींमध्ये ८६७६ धावा केल्या आहेत, ज्यामुळे तो सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सुनील गावसकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यानंतर सर्वाधिक धावा करणारा पाचवा खेळाडू बनला आहे. त्याच्या रेकॉर्डमध्ये २९ शतके आणि ४९.२९च्या उल्लेखनीय सरासरीचा समावेश आहे. कोहलीला २०१८मध्ये ‘आयसीसी टेस्ट प्लेयर ऑफ द इयर’चा पुरस्कारही मिळाला होता.
टीम इंडियाच्या टीकाकारांना गांगुलीचा संदेश
वेस्ट इंडिजविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी२० मालिकेतील पराभवामुळे भारतीय संघाला मोठ्या प्रमाणावर टीकेला सामोरे जावे लागले आहे. कॅरेबियन संघाविरुद्ध १७ वर्षात भारताचा पहिला द्विपक्षीय मालिका पराभव आहे. टी२० संघाचे नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पांड्याला पाच सामन्यांच्या मालिकेदरम्यान काही निर्णयांमुळे टीकेचा सामना करावा लागला. याबद्दल सौरव गांगुलीने मोठे विधान केले आहे.
गांगुली म्हणाला, “तुमचे सर्वोत्तम खेळाडू निवडा. तो डावखुरा असो किंवा उजव्या हाताने फलंदाजी करणारा असो, संघ आधी महत्त्वाचा आहे. भारताला सर्वोत्तम डावखुरे खेळाडू मिळाले आहेत… त्यांना संघात स्थान मिळेल. यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा आणि इशान किशन हे युवा खेळाडू चांगले प्रदर्शन करत आहेत. त्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या आहेतच, त्यामुळे हा एक उत्तम संघ आहे. भारत हा असा देश आहे जिथे प्रत्येक सामन्यानंतर मूल्यमापन होते. जर ते जिंकले तर तो एक चांगला संघ आहे आणि ते हरले तर तो वाईट आहे. हा एक खेळ आहे येथे विजय-पराजय आहे. यातून तुम्हाला पुढे जायचे आहे.”