सेलिब्रेटी आणि त्यांची प्रेमप्रकरणं, भेटीगाठी आणि लग्नं याविषयी चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. टेनिस आणि ग्लॅमर अशा दोन्ही क्षेत्रांत सहजतेने वावरणारी सानिया मिर्झा टेनिस प्रदर्शनाइतकीच गॉसिप चर्चाचा केंद्रबिंदू असते. लग्नाचा पहिला डाव अर्धवट राहिल्यानंतर सानियाने दुसऱ्या वेळेस पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकची साथीदार म्हणून निवड केली.
सानिया भारताची, शोएब पाकिस्तानचा आणि त्यांचं घर दुबईत. खेळण्याच्या निमित्ताने दोघांचीही सातत्याने भ्रमंती सुरू असते. या सक्तीच्या विरहामुळे या दाम्पत्याच्या सहजीवनाविषयी वावडय़ा उठतात. ‘या दोघांचं बिनसलंय’ ही या सदरातली नवीन खेळी. मात्र व्यावसायिक क्रीडापटू असल्याने आम्हाला एकमेकांसाठी पुरेसा वेळ देता येत नाही. पण त्यातून भलते अर्थ काढू नयेत. चर्चा काहीही होत असल्या तरी ‘आमचं झकास चाललंय’ असं सांगत सानियाचा पती शोएब मलिकने खणखणीत ‘स्ट्रेट ड्राइव्ह’ लगावला आहे.
गेल्या काही दिवसांत शोएब आणि अभिनेत्री ह्य़ुमैया मलिक आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यातील जवळीक वाढल्याच्या पाश्र्वभूमीवर शोएबने आपली भूमिका मांडली. ‘‘ह्य़ुमैया माझी खूप चांगली मैत्रीण आहे. सानिया आणि माझे विवाहबंधन मजबूत आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडापटू असल्याने एकमेकांना वेळ देता येणार नाही, याची आम्हा दोघांना कल्पना होती. त्याचा त्रास होण्यापेक्षा आमच्या लग्नाविषयी उडणाऱ्या अफवाच जास्त यातना देतात,’’ असे शोएबने सांगितले.
दोन महिन्यांवर आलेल्या विश्वचषकात खेळण्याची इच्छा नसल्याच्या वृत्ताचेही शोएबने खंडन केले. ‘‘विश्वचषक हा प्रत्येक खेळाडूकरिता कौशल्य सादर करण्याचे सर्वोत्तम व्यासपीठ असते. विश्वचषकात खेळायचे नाही, असे मी कधीच म्हटले नाही. सातत्यपूर्ण प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंना संधी मिळावी असे माझे म्हणणे होते. मी पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सदैव तयार आहे, ती सन्मानाची गोष्ट आहे,’’ असे मलिकने यावेळी स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा