हैदराबाद कसोटी जिंकत भारत दौऱ्याची दणक्यात सुरुवात करणाऱ्या इंग्लंड संघाने विशाखापट्टणम कसोटीसाठी संघात दोन बदल केले आहेत. फिरकीपटू जॅक लिच हैदराबाद कसोटीदरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. कसोटीच्या तिसऱ्या दिवशी त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. दुखापत होऊनही त्याने चौथ्या दिवशी गोलंदाजी केली आणि इंग्लंडच्या विजयात योगदान दिलं. मात्र दुखापतीतून सावरण्यासाठी काही दिवस लागणार असल्याने लिच दुसरी कसोटी खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं. लिचच्या नसण्यामुळे शोएब बशीरचा पदार्पणाचा मार्ग सुकर झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०वर्षीय बशीर इंग्लंड काऊंटी क्रिकेटमध्ये सॉमरसेटसाठी खेळतो. डिसेंबर महिन्यात इंग्लंडने भारत दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली त्यात बशीरचं नाव होतं. भारत दौऱ्यासाठी सरावाचा भाग म्हणून दुबईत शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. बशीरची गोलंदाजी पाहून प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम आणि कर्णधार बेन स्टोक्स प्रभावित झाले. बशीर हैदराबाद कसोटीत पदार्पण करणार अशी चिन्हं होती. इंग्लंडचा संघ भारतात दाखल झाला पण व्हिसा न मिळाल्याने बशीर दुबईतच खोळंबला. व्हिसा न मिळाल्याने अखेर बशीर इंग्लंडला परतला. बशीरला भारतासाठी व्हिसा न मिळाल्याने इंग्लंड संघव्यवस्थापन आणि कर्णधार बेन स्टोक्स नाराज झाले. इंग्लंडमधल्या प्रसारमाध्यमांनीही हा विषय उचलून धरला. बशीरचा जन्म इंग्लंडमध्येच झाला असला तरी त्याचे आईवडील पाकिस्तानचे आहेत. या कारणामुळे त्याला भारताचा व्हिसा मिळण्यात अडचण आली असावी असा सूर उमटला. अखेर बशीरला व्हिसा मिळाला. हैदराबाद कसोटीदरम्यान बशीर भारतात दाखल झाला. जॅक लिच दुखापतग्रस्त झाल्यामुळे बशीरला आता इंग्लंडचं प्रतिनिधित्व करणार आहे.

इंग्लंडने पहिल्या कसोटीत वेगवान गोलंदाज मार्क वूडला खेळवलं होतं. दुसऱ्या कसोटीसाठी मात्र इंग्लंडने वूडऐवजी अनुभवी जेम्स अँडरनसला खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. जेम्स अँडरसनचा हा सहावा भारत दौरा आहे. अँडरसनच्या नावावर कसोटीत ६९० विकेट्स आहेत. या मालिकेत तो ७०० विकेट्सचा टप्पा ओलांडू शकतो. भारतात १३ कसोटीत त्याने ३४ विकेट्स घेतल्या आहेत.

मार्क वूडला हैदराबाद कसोटीत एकही विकेट मिळाली नाही. जेम्स अँडरसनची ही १८४वी कसोटी असेल तर उर्वरित फिरकी त्रिकुटाचा एकूण अनुभव तीन कसोटी एवढाच आहे. रेहान अहमदने डिसेंबर २०२२ मध्ये कसोटी पदार्पण केलं होतं. टॉम हार्टलेने हैदराबाद कसोटीत पदार्पण केलं होतं.

इंग्लंडतर्फे ऑली पोपने हैदराबाद कसोटीत १९६ धावांची मॅरेथॉन खेळी साकारली होती. पोपच्या खेळीनेच सामन्याचं पारडं इंग्लंडच्या बाजूने झुकलं. पोपव्यतिरिक्त अन्य फलंदाजांना मोठी खेळी करता आलेली नाही पण संघव्यवस्थापनाने त्यांच्यावर विश्वास कायम राखला आहे.

दरम्यान भारतीय संघाने अंतिम अकराबाबत घोषणा केलेली नाही. विराट कोहली पहिल्या दोन कसोटींसाठी उपलब्ध नाहीये. पहिल्या कसोटीदरम्यान के.एल.राहुल आणि रवींद्र जडेजा दुखापतग्रस्त झाल्याने सर्फराझ खान, वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमार यांचा संघात समावेश करण्यात आला. जडेजाच्या जागी कुलदीप यादवला संधी मिळण्याची शक्यता आहे. राहुलच्या जागी सर्फराझ खेळणार का रजत पाटीदार याविषयी उत्सुकता आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shoaib bashir to debut james anderson also part of playing eleven for visakhapatnam test psp