शोएब मलिक दोन दशकांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. अशा स्थितीत त्याच्याकडे असलेल्या अनुभवाचे प्रमाण लक्षात घेता, तो हुशार असणे अपेक्षित आहे. मात्र बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात ३९ वर्षीय शोएब मलिकने निष्काळजीपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आणि धावबाद झाला. पाकिस्तानच्या डावाच्या सहाव्या षटकात ही घटना घडली. हे षटक बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानने टाकले. शोएब मलिकने त्याच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर बचावात्मक फटका खेळला. चेंडू यष्टीरक्षक नुरुल हसनकडे गेला. त्यावेळी शोएब क्रिजबाहेर उभा होता आणि चालत होता.
याचाच फायदा नुरुल हसन याने घेतला आणि चेंडू लगेच स्टंपवर फेकला. यानंतर थर्ड अंपायरने शोएबला बाद ठरवले. तो तीन चेंडूत एकही धाव न काढता पॅव्हेलियनमध्ये परतला. शोएब अशा प्रकारे धावबाद झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पाकिस्तानी चाहत्यांनाही शोएबची ही कृती पचनी पडली नाही.
हेही वाचा – VIDEO : चेंडूचा वेग २१९ kmph..! पाकिस्तानसाठी ‘खलनायक’ ठरलेल्या हसन अलीचा नवा कारनामा; चाहते हैराण!
शोएब मलिकने नुकत्याच पार पडलेल्या टी-२० विश्वचषकात चांगली फलंदाजी केली. त्याने ६ सामन्यात १८१ पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने १०० धावा केल्या. त्यात एका अर्धशतकाचाही समावेश होता.
या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना १२७ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने १९.२ षटकांत लक्ष्य गाठले. बाबर आझमला केवळ ७ धावा करता आल्या. शादाब खान (२१) आणि मोहम्मद नवाज (१८) यांनी १५ चेंडूत ३६ धावांची नाबाद भागीदारी करत संघाला ४ गडी राखून रोमहर्षक विजय मिळवून दिला.