पाकिस्तानचा ज्येष्ठ क्रिकेटपटू शोएब मलिकने अनोख्या विक्रमाची नोंद आपल्या नावावर केली आहे. भारताच्या रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मागे टाकत शोएब टी-२० क्रिकेटमध्ये २ हजार धावांचा पल्ला गाठणारा पहिला आशियाई खेळाडू ठरला आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्याआधी शोएब मलिकला २ हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी अवघ्या ११ धावांची गरज होती. रोहित आणि विराटला शोएब मलिकआधी हा सन्मान आपल्या नावावर करण्याची संधी आली होती, मात्र आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात दोन्हीही खेळाडू ही कामगिरी करण्यासात अपयशी ठरले.
मात्र झिम्बाब्वे, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिरंगी मालिकेदरम्यान पहिल्याच सामन्यात शोएब मलिकने आपल्याकडे असलेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलला. मलिकने झिम्बाब्वेविरुद्ध सामन्यात २४ चेंडूत ३७ धावांची नाबाद खेळी केली. २ हजार धावांचा पल्ला शोएब मलिकने ९२ डावांमध्ये पूर्ण केला आहे.
जाणून घेऊयात आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –
१) मार्टिन गप्टील – न्यूझीलंड – २२७१ धावा
२) ब्रेंडन मॅक्युलम – न्यूझीलंड – २१४० धावा
३) शोएब मलिक – पाकिस्तान – २०२६ धावा
४) विराट कोहली – भारत – १९९२ धावा
५) रोहित शर्मा – भारत – १९४९ धावा
६) मोहम्मद शेहजाद – अफगाणिस्तान – १९०६ धावा
७) तिलकरत्ने दिलशान – श्रीलंका – १८८९ धावा
८) जे. पी. ड्युमिनी – दक्षिण आफ्रिका – १८२२ धावा
९) डेव्हिड वॉर्नर – ऑस्ट्रेलिया – १७९२ धावा
१०) इयॉन मॉर्गन – इंग्लंड – १६९३ धावा