स्पॉट-फिक्सिंग प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरविले असताना मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही आपले मौन सोडले आहे. गेले दोन आठवडे घडणाऱ्या घडामोडी या ‘दु:खद आणि धक्कादायक’ आहेत. लक्षावधी क्रिकेटरसिकांच्या विश्वासाला पात्र ठरायलाच हवे. या प्रकरणी क्रिकेट प्रशासनाने प्रामाणिकपणे पावले उचलावी आणि क्रिकेटची प्रतिष्ठा जपावी, असे आवाहन सचिनने केले. रविवारी मुंबई इंडियन्सला जेतेपद मिळाल्यानंतर आयपीएल क्रिकेट स्पध्रेतून निवृत्ती पत्करणाऱ्या सचिनने सांगितले की, एक क्रिकेटपटू म्हणून मी नेहमी खेळभावनांचा आदर राखून खेळलो.
‘‘क्रिकेट हा खेळ जेव्हा चुकीच्या कारणांसाठी चर्चेत येतो, तेव्हा मला नेहमी दु:ख होते. गेल्या दोन आठवडय़ांमधील घडामोडी या दु:खद आणि धक्कादायक होत्या. एक क्रिकेटपटू म्हणून आम्हाला नेहमी असे शिकवले जाते की, हिंमतीने लढा, आपला सर्वोत्तम खेळ दाखवा आणि खेळाच्या सच्च्या भावना जपणारा खेळ सादर करा,’’ असे सचिनने सांगितले.
क्रिकेटजगतामध्ये अनेक विक्रम नावावर असणाऱ्या सचिनने सांगितले, ‘‘या कठीण काळात मी प्रत्येक क्रिकेटपटूसोबत असेन, जो देशातील मैदानांवर क्लब्ज किंवा राज्याचे अथवा देशाचे प्रतिनिधित्व करतो. आम्हा सर्वाना क्रिकेट प्रशासनावर विश्वास आहे की ते प्रामाणिकपणे पावले उचलून ही समस्या सोडवतील.’’
‘‘लक्षावधी क्रिकेटरसिकांमध्ये क्रिकेटबाबतचा विश्वास पुन्हा निर्माण करायला हवा आणि भारतीय क्रिकेट हा संपूर्णत: अभिमानाचा आणि आनंदाचा विषय आहे, ही खात्री त्यांना पटायला हवी. या प्रयत्नांमध्ये मी प्रत्येक क्रिकेटपटूसोबत असेन,’’ असे सचिन यावेळी म्हणाला.
‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणाचा पर्दाफाश झाल्यापासून दोन आठवडे उलटले आहेत. पण भारतीय संघातील कोणत्याही क्रिकेटपटूने याविषयी आपले मत प्रदर्शित केलेले नाही. परंतु सचिनने या संदर्भात आपले निवेदन प्रकट केल्यामुळे ते फार महत्त्वपूर्ण मानले जात आहे. बीसीसीआयच्या बंधनांमुळे भारताचा संघनायक महेंद्रसिंग धोनीने मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत मौन बाळगले, मात्र इंग्लंडमध्ये गेल्यावर ‘योग्य वेळी बोलेन’ असे सूचक विधान केले होते. भारतीय क्रिकेटची प्रतिमा ढासळलेली नाही, असे मतही त्याने प्रकट केले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा