Sexual Harassment: बाईचं आयुष्य कधीच सहज नसतं. मग ती गृहिणी असो, वर्किंग वुमन असो किंवा अगदी एखादी खेळाडू. अगोदरच महिलांना मिळणाऱ्या संधी कमी असल्याने लाखोंमधल्या अवघ्या मोजक्याच जणी पुढे जाऊ शकतात. अशात चिकाटीने तिने कितीही प्रगती केली तरी तिच्या प्रत्येक कृतीला अश्लील नजरेने पाहणारेच जास्त असतात. अलीकडेच इंग्लंडच्या अंडर १९ क्रिकेट संघातील खेळाडू तरुणी सुद्धा याच प्रवृत्तीच्या शिकार ठरल्या.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) बुधवारी, दक्षिण आफ्रिकेत १४ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ICC महिला U19 विश्वचषक स्पर्धेच्या ऐतिहासिक उद्घाटनासाठी रवाना होणाऱ्या U19 महिला संघाचा फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये अगदी साध्या शब्दात सांगायचं तर आनंदी क्रिकेटपटू दिसत होत्या. काही १७ वर्षांच्या तरुणींच्या चेहऱ्यावर कारकिर्दीतील पहिल्या मेगा क्रिकेट स्पर्धेपूर्वीचा अभिमान, भीती, उत्साह हे सगळे भाव दिसत होते. मात्र म्हणतात ना नजरेत खोट असली की माणसाची बुद्धी भ्रष्ट होते, तसंच काहीसं घडलं.
या तरुणींच्या फोटोवर अनेकांनी कमेंट करून तुमचे इंस्टाग्राम हँडल द्या अशी मागणी करायला सुरुवात केली. काहींनी तर तुम्ही सगळ्यांनी सौंदर्य स्पर्धांमध्ये सहभागी व्हा असा सल्ला दिला. त्यांच्या चेहऱ्यापासून, केसांपासून सगळ्या गोष्टींवर त्यांनी अत्यंत अनावश्यक व विचित्र कमेंट्स केल्या होत्या. एका युजरने तर चक्क हा फोटो झूम करून एका क्रिकेटपटूच्या चेहऱ्यावर गोल मार्क करून तिचा ठावठिकाणा विचारला.
घाणेरड्या कमेंट्सवर भडकले नेटकरी
दरम्यान, जगात जितके वाईट लोक आहेत तितकेच चांगलेही आहेत हे या फोटोच्या कमेंट बॉक्समध्ये दिसून आलं. या कमेंट्सवर अनेक नेटिझन्सने टीका करून अशा चुकीच्या कमेंट करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. महिलांच्या ‘सौंदर्यापुढे’ तुम्हाला काहीच दिसत नाही का? सेक्सच्या पलीकडे महिलांना बघितलंच जाऊ नये का? असे एका पत्रकाराने कमेंट करून लिहिले आहे.
तर शेली मारी हिप या महिलेने या कमेंट्स करणाऱ्यांचा समाचार घेत “आपल्या मुलीच्या फोटोवर अशा कमेंट वाचताना दुःख होते आणि अशा कमेंट वाचताना स्वतःलाच थांबवावे लागते असे लिहिले आहे.
दरम्यान १४ ते २९ जानेवारी दरम्यान दक्षिण आफ्रिकेत पहिल्या U19 महिला विश्वचषकासाठी १६ देशाचे संघ आमनेसामने येणार आहेत.