लंडन : ग्रीसचा नामांकित टेनिसपटू स्टेफानोस त्सित्सिपासचे विम्बल्डन स्पर्धेतील आव्हान दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आले. गतविजेत्या कार्लोस अल्कराझलाही तिसरी फेरी गाठण्यासाठी पाच सेट झुंजावे लागले. महिलांमध्ये जॅस्मिन पाओलिनीने सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन कायम ठेवताना चौथ्या फेरीत प्रवेश केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्सित्सिपासला बिगरमानांकित एमिल रुसुवुओरीकडून ६-७ (६-८), ६-७ (१०-१२), ६-३, ३-६ असा पराभव पत्करावा लागला. पहिल्या आणि तिसऱ्या सेटमध्ये त्सित्सिपासला संधी होती, पण ती साधण्यात तो अपयशी ठरला. अल्कराझने २२व्या मानांकित अमेरिकेच्या फ्रान्सिस टिआफोचे आव्हान संघर्षपूर्ण लढतीत ५-७, ६-२, ४-६, ७-६ (७-२), ६-२ असे परतवून लावले.

महिला एकेरीत, इटलीच्या सातव्या मानांकित पाओलिनीने शुक्रवारी अमेरिकन खुल्या स्पर्धेची माजी विजेती बिआन्का आंद्रेस्कूला ७-६ (७-४), ६-१ असे पराभूत केले. पाओलिनीने विम्बल्डन स्पर्धेत प्रथमच चौथ्या फेरीत प्रवेश केला. यंदा फ्रेंच स्पर्धेत उपविजेती राहिलेल्या पाओलिनीने यंदा ऑस्ट्रेलियन स्पर्धेचीही चौथी फेरी गाठली होती. एकाच वर्षात सलग तीन ग्रँडस्लॅम स्पर्धांच्या चौथ्या फेरीत प्रवेश करणारी पाओलिनी इटलीची पहिलीच महिला टेनिसपटू ठरली. पाओलिनीची गाठ आता १२व्या मानांकित मेडिसन किजशी पडणार आहे. मेडिसनने तिसऱ्या फेरीत मार्टा कोत्स्युकचा ६-४, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.

हेही वाचा >>> “माझा अहंकार डोकं वर काढू..”, विराटने मोदींसमोर सांगितला मैदानातील किस्सा; किंग कोहलीची हळवी बाजू पाहा

पुरुष दुहेरीतून मरेचा भावपूर्ण निरोप

● कारकीर्दीतील अखेरची विम्बल्डन स्पर्धा खेळणाऱ्या अँडी मरेसाठी पुरुष दुहेरीत पहिलीच फेरी निरोपाची ठरली. रिंकी हिजिकाटा-जॉन पीअर्सने जोडीने अँडी आणि जेमी मरे जोडीचा ७-६ (८-६), ६-४ असा पराभव केला.

● पराभवानंतर सेंटर कोर्टवर सोडताना मरेला उपस्थित सर्व प्रेक्षकांनी उभे राहून मानवंदना दिली. तेव्हा त्याचे डोळे पाणावले. या वेळी रॉजर फेडरर, राफेल नदाल, नोव्हाक जोकोविच आणि व्हिनस विल्यम्स यांचे व्हिडिओ संदेश दाखवण्यात आले.

● मरे आता मिश्र दुहेरीत ब्रिटनच्याच एमा रॅडूकानूच्या साथीने खेळणार आहे. त्यांची दुसऱ्या फेरीची लढत आज, शनिवारी होणार आहे. मरेने एकेरीत सहभाग नोंदवला नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking results from wimbledon 2024 stefanos tsitsipas exit in second round of wimbledon zws
Show comments