Shoib Akhtar’s reply to Sachin Tendulkar IND vs PAK Match: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये शनिवारी (१४ ऑक्टोबर) भारताने पाकिस्तानचा दारूण पराभव केला. यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या माजी दिग्गज खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक झालेली पाहायला मिळाली. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने केलेल्या एका ट्वीटला सचिन तेंडुलकरने प्रत्युत्तर दिलं. यानंतर आता पुन्हा अख्तरने त्यावर प्रतिक्रिया देत कौतुक केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शोएब अख्तर म्हणाला, “माझ्या मित्रा, तू या खेळाची प्रशंसा करणारा सर्वकालीन महान खेळाडू आहेस. तसेच या खेळाचा सर्वात मोठा राजदूत आहेस. आपल्या मैत्रीपूर्ण थट्टामस्करीने हे नक्कीच बदलणार नाही.”

काय होतं संपूर्ण प्रकरण?

वास्तविक, शोएब अख्तरने १३ ऑक्टोबर रोजी एक्सवर (ट्वीटर) एक पोस्ट केली होती. यामध्ये त्याने सचिन तेंडुलकरला बाद करतानाचा जुना फोटो शेअर केला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले होते की, उद्या तुम्हाला असे काही करायचे असेल तर शांत राहा. आता त्याच पोस्टला उत्तर देताना सचिन तेंडुलकरने पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला चोख प्रत्युत्तर दिले आहे. सचिनच्या उत्तराचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.

सचिनने काय दिले प्रत्युत्तर?

सचिन तेंडुलकरने शोएब अख्तरच्या पोस्टला उत्तर देताना लिहिले की, ‘माझ्या मित्रा तुझ्या सल्ल्याचे पालन केले आणि सर्वकाही पूर्णपणे थंड ठेवले.’ सचिनच्या या उत्तरामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. पहिल्या डावात पाकिस्तानने ६ विकेट्स गमावल्यानंतर शोएब अख्तरने यापूर्वी निराशा व्यक्त केली होती. पाकिस्तानच्या फलंदाजावर प्रतिक्रिया देताना त्याने आपली निराशा व्यक्त केली.

हेही वाचा : भारताकडून पाकिस्तानचा दारूण पराभव; पंतप्रधान मोदी म्हणाले, “भारतीय संघाने अहमदाबादमध्ये…”

भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

सामन्याबद्दल बोलायचे, तर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचा संघ ४२.५ षटकांत १९१ धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात भारताने ३०.३ षटकांत ३ गडी गमावत १९२ धावा करून सामना जिंकला. टीम इंडियाने विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानविरुद्धची विजयी मालिका सुरू ठेवली आहे. भारताचा हा आठवा विजय आहे. कर्णधार रोहित शर्माने ८६ धावांची शानदार खेळी केली. त्याचवेळी जसप्रीत बुमराहने सात षटकात १९ धावा देत दोन बळी घेतले. त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shoib akhtar comment on sachin tendulkar reply ind vs pak match pbs