Shooter Manu Bhaker wins bronze medal in womens 10m air pistol : भारताची २२ वर्षीय नेमबाज मनू भाकेरने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये इतिहास रचला आहे. तिने या स्पर्धेत कांस्यपदकावर आपले नाव कोरले आहे. मनू भाकेरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करत कांस्यपदक जिंकले. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू ही पहिली महिला नेमबाज ठरली आहे. नेमबाजीत भारताच्या मनू भाकेरने कांस्य पदक जिंकत यंदाच्या ऑलिम्पिक २०२४ मधील पहिले पदक पटकावून दिले आहे. पॉईंट १ गुणाने मागे राहिल्याने मनू भाकेरला तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले.
कोरियाच्या नेमबाजाने आघाडी मिळवली. मनू भाकेरने अंतिम सामन्यात २२१.७ गुणांसह हे पदक जिंकले. पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचे हे पहिले पदक आहे. मनू भाकेर २१व्या शॉटने दुसऱ्या स्थानावर पोहोचली होती, पण अखेरीस ती तिसऱ्या स्थानावर राहिली. कोरियाच्या दोन्ही नेमबाजांनी सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले. मनू भाकेर ही भारताला नेमबाजीमध्ये भारताला पदक जिंकवून देणारी पहिली महिला नेमबाज ठरली आहे. सुरूवातीपासूनच मनू दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी कायम होती पण अवघ्या एका पॉईंटने मनू मागे राहिली. पण तिने भारताला पदक पटकावून दिलं.
मनू आशियाई क्रीडा स्पर्धेच्या संघात नव्हती –
अवघ्या नऊ महिन्यांपूर्वी मनू भाकेरचा १० मीटर एअर पिस्तुलसाठी भारतीय संघात समावेशही नव्हता. गेल्या वर्षी ती हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळली होती, पण या स्पर्धेसाठी ती संघात नव्हती. ही घटना तिच्या हृदयाच्या सर्वात जवळ आहे. एशियाडपूर्वी मनू भाकेरने मागील सर्व वाद विसरून प्रशिक्षक जसपाल राणा यांच्याशी हातमिळवणी केली, यामागचे एक कारण म्हणजे १० मीटर एअर पिस्तुलमध्ये पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करणे. एशियाडनंतर मनूचे समर्पण आणि जसपालची साथ कामी आली.
हेही वाचा – IND vs SL: ऋषभ पंतचा अनोखा शॉट, चेंडू गेला सीमारेषेपार तर बॅटलाही उडवलं हवेत… VIDEO होतोय व्हायरल
कोण आहे मनू भाकेर?
मनू भाकेर हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील गोरिया गावातील रहिवासी आहे. २०१८ आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत मनूने भारतासाठी दोन सुवर्णपदके जिंकली होती. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती सर्वात तरुण भारतीय महिला नेमबाज राहिली आहे. वयाच्या १६ व्या वर्षी मनूने २०१८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी दोन सुवर्णपदके जिंकली. तिच्या पिस्तूलमध्ये बिघाड झाल्यामुळे ती टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये पदक जिंकू शकली नाही.
हेही वाचा – Paris Olympic 2024 Live Updates: पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी
मनूने ५० हून अधिक आंतरराष्ट्रीय आणि ७० राष्ट्रीय पदके जिंकली आहेत. २०२१ च्या ऑलिम्पिकमध्ये ती सातव्या स्थानावर राहिली. २०२३ मध्ये मनूने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अनेक वैयक्तिक स्पर्धांमध्ये भाग घेणारी २२ सदस्यीय भारतीय नेमबाजी संघातील ती एकमेव खेळाडू आहे. हरियाणातील झज्जर येथे जन्मलेल्या मनू भाकरने शालेय जीवनात टेनिस, स्केटिंग आणि बॉक्सिंगसह अनेक खेळांमध्ये भाग घेतला. बॉक्सिंग खेळताना मनूच्या डोळ्याला दुखापत झाली. यानंतर तिचा बॉक्सिंगमधील प्रवास संपला. त्याचबरोबर, मनूला इतरही वेगळ्या खेळांची आवड होती, ज्यामुळे ती एक उत्कृष्ट नेमबाज बनण्यात यशस्वी झाली. आता तिने देशासाठी पदक जिंकलं आहे.