ऑलिम्पिक असो की राष्ट्रकुल किंवा आशियाई क्रीडा स्पर्धा असो, हमखास पदकाची शाश्वती देणारा आधारवड म्हणजे नेमबाजी. मानसिक कणखरता आणि एकाग्रता यांच्या बळावर लक्ष्यवेध करणारे ४३ नेमबाज आशियाई क्रीडा स्पर्धेत आपले नशीब आजमावणार आहेत. क्रिकेटेतर खेळांना स्वतंत्र ओळख मिळवून देण्याचे काम अभिनव बिंद्राच्या ऑलिम्पिक सुवर्णपदकाने केले. शेवटची राष्ट्रकुल स्पर्धा खेळणाऱ्या अभिनवची ही शेवटची आशियाई क्रीडा स्पर्धा असू शकते. जागतिक स्तरावरच्या सर्व प्रतिष्ठेच्या स्पर्धाची पदके अभिनवच्या नावावर आहे. मात्र या स्पर्धेने त्याला पदकापासून वंचित ठेवले आहे. हा हिशेब चुकता करण्यासाठी अभिनव तय्यार आहे.
भारतीय नेमबाजाची पताका आंतरराष्ट्रीय स्तरावर दिमाखाने फडकवत ठेवण्यात अभिनवचा वाटा सिंहाचा आहे. आशियाई स्तरावर वर्चस्व गाजवून स्पर्धेला अलविदा करण्याचा अभिनवचा मानस असेल. खेळाडू म्हणून कर्तृत्व सिद्ध केल्यानंतर गगन नारंगने ‘गन फॉर ग्लोरी’च्या माध्यमातून नवे नेमबाज घडवण्याचा वसा हाती घेतला आहे. गेल्या काही दिवसांत कामगिरीत घसरण झालेल्या गगनला विजयपथावर परतण्याची ही चांगली संधी आहे.
लष्करात कार्यरत जितू राय हा भारतीय नेमबाजी विश्वातील नवा तारा. म्युनिक नेमबाजी विश्वचषकात सुवर्णपदकाबरोबरच मारिबोर विश्वचषकातही जितूने सुवर्ण आणि रौप्यपदकाची कमाई केली. या धवल यशासह त्याने जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी झेप घेतली. राष्ट्रकुल स्पर्धेत ५० मीटर पिस्तूल प्रकारात त्याने सुवर्णपदकावर कब्जा केला. ग्रॅनडा, स्पेन येथे झालेल्या नेमबाजी विश्वचषकात रौप्यपदकासह रिओ ऑलिम्पिकचे तिकीट पक्के करणारा जितू आशियाई क्रीडा स्पर्धेतही भारताचा हुकमी एक्का आहे.
या स्पर्धेच्या निमित्ताने नेमबाजीत खांदेपालटाचे स्थित्यंतर पाहायला मिळणार आहे. अभिनव, गगन यांचा वारसा चालवण्याची जबाबदारी जितू राय, हिना सिद्धू, राही सरनोबत, अयोनिका पॉल, मलायका गोएल या युवा शिलेदारांवर आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत पदक पटकावणाऱ्या या वीरांसमोर आशियाई क्रीडा स्पर्धेत खडतर आव्हान उभे ठाकणार आहे. ग्रॅनडा, स्पेन येथे झालेल्या नेमबाजी भारतीय नेमबाजांची कामगिरी सर्वसाधारण झाली आहे. ही स्पर्धा संपल्यानंतर जेमतेम आठ दिवसांच्या आत आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत ४ सुवर्ण, १५ रौप्य आणि २२ कांस्यपदकांसह एकूण ४१ पदकांची कमाई केलेली आहे.
सहभागी खेळाडू
पुरुष – रायफल थ्री पोझिशन : संजीव राजपूत, गगन नारंग, चैन सिंग, प्रोन- हरिओम सिंग, गगन नारंग, जॉयदीप कर्माकर, १० मी एअर रायफल- अभिनव बिंद्रा, रवी कुमार.
पिस्तूल : सेंटर फायर-विजय कुमार, पेंबा तमांग, गुरप्रीत सिंग, रॅपिड फायर-हरप्रीत सिंग, गुरप्रीत तेंबा, स्टॅण्डर्ड-समरेश जंग, महावीर सिंग, गुरप्रीत, फ्री-जितू राय, ओम प्रकाश, ओंकार सिंग, जितू राय, पीएन प्रकाश, समरेश.
शॉटगन : ट्रॅप-मानवजीत सिंग संधू, कन्यान चेनई, मनशेर सिंग, स्कीट-मैइराज अहमद खान, अरोझपाल संधू, परमपाल सिंग, डबल ट्रॅप-अंकुर मित्तल, मोहम्मद असाब, संग्राम दहिया.
महिला – रायफल थ्री पोझिशन : लज्जा गोस्वामी, तेजस्विनी मुळ्ये, अंजली भागवत. प्रोन- लज्जा गोस्वामी, तेजस्विनी मुळ्ये, राज चौधरी, एअर रायफल-अयोनिका पॉल, राज चौधरी, अपूर्वी चंडेला.
पिस्तूल : स्पोर्ट्स-राही सरनोबत, अनिसा सय्यद, हीना सिद्धू. एअर-हीना सिद्धू, श्वेता चौधरी, मलायका गोएल.
शॉटगन : ट्रॅप-श्रेयसी सिंग, सीमा तोमार, शगुन चौधरी. स्कीट-आरती सिंग राव, रश्मी राठोड. डबल ट्रॅप-श्रेयसी सिंग, वर्षां वर्मन,
पदकांचा आधारवड!
ऑलिम्पिक असो की राष्ट्रकुल किंवा आशियाई क्रीडा स्पर्धा असो, हमखास पदकाची शाश्वती देणारा आधारवड म्हणजे नेमबाजी.
First published on: 18-09-2014 at 03:42 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shooting base for india to get medals in asian games