२०१९ विश्वचषक स्पर्धेत ऋषभ पंतने अखेरीस इंग्लंडविरुद्ध सामन्यात भारतीय संघात पदार्पण केलं आहे. शिखर धवन अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे संघाबाहेर गेला. यानंतर ऋषभ पंतला संघात स्थान देण्यात आलं. अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्ध सामन्यात विजय शंकरला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता न आल्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी ऋषभ पंतला संधी मिळायला हवी अशी मागणी केली.
इंग्लंडविरुद्ध सामना सुरु होण्याआधी मैदानात उपस्थित असलेल्या पत्रकारांनी भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागला ऋषभ पंत विषयी प्रश्न विचारला. ऋषभला रोहितसोबत भारतीय डावाची सुरुवात करण्याची संधी मिळायला हवी का? या प्रश्नाला सेहवागने आपल्या मजेशीर शैलीत उत्तर दिलं आहे.
“हो, ऋषभ पंत भारतीय संघासाठी सलामीवीर म्हणून काम करेल; मात्र ५ वर्षांनी. सध्या शिखर धवन आणि रोहित शर्मा हे भारतीय संघाचे सलामीवीर म्हणून उत्तम पर्याय आहेत. भारताची ही जोडी सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम सलामीची जोडी आहे. आता दोन्हीही फलंदाज वयाच्या तिशीमध्ये आहेत, त्यामुळे पाच वर्षांनी ऋषभला सलामीवीराची भूमिका नक्की मिळेल.”
दरम्यान, भारताविरुद्ध सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर जॉनी बेअरस्टो आणि जेसन रॉय यांनी चौफेर फटकेबाजी करत इंग्लंडला शतकी मजल मारुन दिली.