आयपीएल २०२२ मध्ये सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या  संघासाठी मुख्य चिंतेचा विषय म्हणजे त्यांचा माजी कर्णधार विराट कोहलीचा फॉर्म आहे. विराट कोहलीला यंदाच्या आयपीएलमध्ये धावांसाठी झगडावे लागत आहे. त्याच्या कामगिरीबाबत अनेक दिग्गजांनी आपली मते व्यक्त केली आहेत. भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनीही विराटबाबत खेळाबाबत भाष्य केले आहे. दिलीप वेंगसरकर यांनी एबीपी माझाच्या महाकट्टा या कार्यक्रमात विराटबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

“विराट कोहलीची फलंदाजी मी टिव्हीवर पाहिली होती. प्रविण आम्रे प्रशिक्षक असताना आम्ही विराटला संघात घेतले होते. त्यावेळी न्यूझीलंड सोबत आमचा सामना होता. त्यावेळी आम्रेंनी विराटला सलामीवीर म्हणून जाणार का असे विचारले होते. त्यावर विराटने हो म्हटले. त्यावेळी विराटने १२३ नाबाद धावांची खेळी केली. १०० धावा केल्यानंतरही त्याने आपली विकेट जावू दिली नाही आणि मॅच संपल्यानंतर तर पॅव्हेलियनमध्ये आला हे मला भावले. तेव्हा मला हा परिपक्व असल्याचे वाटले आणि श्रीलंका दौऱ्यात त्याला संधी देण्यात आली,” असे वेंगसरकर म्हणाले.

“विराटने सामने खेळत राहायला पाहिजे. आता विश्रांती घेऊन फायदा नाही कारण त्याच्याकडून धावा होत नाहीयेत. धावा काढून विश्रांती घेतली तर गोष्ट वेगळी आहे. धावा न करता असे करणे चुकीचे आहे. तुम्ही फलंदाजी करता तेव्हाच फॉर्ममध्ये येऊ शकता. तुमच्या मागे धावा असतील तर तुम्हाला ते उपयोगी ठरते. तुम्ही अयशस्वी ठरताय आणि त्यामुळे आराम करताय याला काही अर्थ नाही,” असे दिलीप वेंगसरकर म्हणाले.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून फॉर्मात नसलेल्या विराट कोहलीने गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात शानदार खेळी केली. या सामन्यात विराट कोहलीने अर्धशतक झळकावले. यंदाच्या आयपीएल हंगामातील विराट कोहलीचे हे पहिलेच अर्धशतक आहे.

Story img Loader