चेन्नईयन क्लबविरुद्ध इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पध्रेचा अंतिम सामना गमावल्यानंतर बेशिस्त वर्तन केल्याबद्दल गोवा फुटबॉल क्लबला अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.
महासंघाने दिलेल्या नोटिशीमध्ये गोवा क्लबवर कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत दिले असून, त्यांना उत्तर पाठविण्यासाठी ८ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. क्लबला स्वतंत्ररीत्या नोटीस दिली असून, संघातील प्रत्येक खेळाडूलाही नोटीस देण्यात आली आहे. सांघिकरीत्या बेशिस्त वर्तन करणे, धमकी देणे, आदी आरोप या खेळाडूंवर ठेवण्यात आले आहेत.
सामना संपल्यानंतर लगेचच गोवा क्लबच्या काही खेळाडू व सहयोगी प्रशिक्षकांनी मैदानावरील पंचांना जिवे मारण्याची धमकी दिली होती व शिवीगाळ केली होती, तसेच चेन्नईयनच्या खेळाडूंनाही धक्काबुक्की केली होती.