महाराष्ट्र रायफल असोसिएशनतर्फे आयोजित तिसाव्या राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत मंगळवारचा दिवस नाशिकच्या श्रेया गावंडने गाजवला. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स किताबासह श्रेयाने स्पोर्ट्स पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. एअर पिस्तूल प्रकारात मुंबईच्या रुचिता विनरेकरने सुवर्णपदकावर नाव कोरले. तेहरान, इराण येथे नुकत्याच झालेल्या आशिया नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करून परतलेल्या नाशिकच्या श्रेया गावंडला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. सोनाली पारेरावने कांस्यपदक पटकावले.
एअर पिस्तूल प्रकारात चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्ससाठीच्या पुरुष आणि महिला दोन्ही गट मिळून झालेल्या मुकाबल्यात श्रेया गावंडने बाजी मारली.  फ्री पिस्तूल पुरुषांच्या गटात मुंबईच्या रौनक पंडितने सुवर्णपदकावर कब्जा केला. कैकश्रु इराणीने रौप्य तर शेहझाद मिर्झाने कांस्यपदक पटकावले. स्पोर्ट्स पिस्तूल महिला गटात श्रेया गावंडने सुवर्णपदकावर नाव कोरले. नाशिकच्याच श्रद्धा नलमवारने रौप्य, तर सोनाली पारेरावने कांस्यपदक पटकावले.

Story img Loader