नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात लखनऊ येथील एकाना स्टेडियमच्या आव्हानात्मक खेळपट्टीवर सूर्यकुमार यादवने महत्त्वपूर्ण खेळी साकारली. त्याच वेळी श्रेयस अय्यर बेजबाबदार फटका मारून बाद झाला. त्यामुळे एकदिवसीय विश्वचषकातील आगामी सामन्यांत हार्दिक पंडय़ाचे पुनरागमन झाल्यावर श्रेयसचे स्थान धोक्यात येण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या सूर्यकुमारला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सुरुवातीला चांगली कामगिरी करण्यात अपयश येत होते. परंतु विश्वचषकापूर्वी झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सूर्यकुमारने दोन अर्धशतके झळकावली होती. तसेच विश्वचषकात हार्दिकला दुखापत झाल्यानंतर सूर्यकुमारला संधी मिळाली आणि त्याने या संधीचा चांगला उपयोग केला. एकाना स्टेडियमच्या खेळपट्टीवर कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल वगळता भारताचे सर्वच आघाडीचे फलंदाज अपयशी ठरले. मात्र, सूर्यकुमारने संयम राखला आणि ४७ चेंडूंत ४९ धावांची खेळी करत भारताला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. अखेर भारताला हा सामना जिंकण्यातही यश आले.

दुसरीकडे श्रेयसने मात्र पुन्हा निराशा केली. श्रेयसने पाकिस्तानविरुद्ध अर्धशतक केले होते. याव्यतिरिक्त त्याला एकदाही ३५ धावांचा टप्पा ओलांडता आलेला नाही.त्यातच आता सूर्यकुमारने चमक दाखवल्याने श्रेयसवरील दडपण वाढले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shreyas ayer position is in danger after hardik pandya comeback in the upcoming matches of odi world cup 2023 amy
Show comments