Shreyas Iyer in Vijay Hazare Trophy: देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघाचे नेतृत्त्व करत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या श्रेयस अय्यरने पुन्हा एकदा आपल्या कामगिरीने लक्ष वेधलं आहे. श्रेयसने आपल्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर विजय हजारे ट्रॉफीमध्ये संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. श्रेयस अय्यर विजय हजारे ट्रॉफीमध्येही आपल्या संघाचे नेतृत्व करत आहे. अलीकडेच त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीही जिंकली. चॅम्पियन्स ट्रॉफी जवळ आल्याने श्रेयसची ही खेळी आणखी महत्त्वाची ठरली आहे.
मुंबई वि हैदराबादचा सामना
विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबई आणि अहमदाबाद या संघांमध्ये अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला गेला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या हैदराबाद संघाने आपले सर्व विकेट गमावत ३८.१ षटकांत केवळ १६९ धावांची माफक धावसंख्या उभारली. म्हणजे मुंबईसमोर कमी धावसंख्येचे आव्हान होते. त्यामुळे श्रेयस अय्यरने काही प्रयोग करून नवीन खेळाडूंना प्रथम खेळण्याची संधी दिली.
हेही वाचा – Vinod Kambli: विनोद कांबळीची तब्येत बिघडली, तात्काळ रूग्णालयात केलं दाखल
अंगक्रिश रघुवंशी आणि आयुष म्हात्रेची जोडी सलामीला उतरली आणि दोघेही अनुक्रमे १९ आणि २८ धावा करत बाद झाले. हार्दिक तामोरे आणि शार्दुल ठाकूर शून्यावर बाद झाले. तर सय्यद मुश्ताक अली अंतिम सामन्याचे हिरो सूर्यांश शेडगे आणि अथर्व अंकोलेकरही स्वस्तात बाद झाले. यानंतर तनुष कोटियनने ३९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
हेही वाचा – PV Sindhu Wedding: पीव्ही सिंधूने बांधली लग्नगाठ, विवाह सोहळ्यातील पहिला फोटो आला समोर
सूर्यकुमार यादव आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. तो २३ चेंडूत केवळ १८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. या खेळीत सूर्याने दोन चौकार आणि एक षटकार लगावला. यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर नवव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. जेव्हा सूर्यकुमार यादव बाद झाला तेव्हा संघाची धावसंख्या १०५ धावा होती, याचा अर्थ विजयासाठी मुंबईला अजून बऱ्याच धावांची गरज होती तर चेंडूही बाकी होते. तेव्हा श्रेयस अय्यरने जबाबदारी स्वीकारली आणि आपल्या संघाला विजयाकडे नेले.
श्रेयस अय्यरने २० चेंडूत ४४ धावांची अप्रतिम खेळी केली. यादरम्यान त्याने चार चौकार आणि तीन षटकार लगावत प्रतिस्पर्धी संघाचा पराभव केला. नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेतही श्रेयस अय्यरने उत्कृष्ट खेळी करत संघाचे उत्तम नेतृत्त्व करत जेतेपद पटकावून दिले.
सध्या भारतीय संघाबाहेर असलेल्या श्रेयस अय्यरने या वर्षी ऑगस्टमध्ये श्रीलंकेविरुद्ध भारताकडून शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. श्रेयस अय्यरला टी-२० आणि कसोटी संघातही स्थान मिळू शकले नाही, पण तो एकदिवसीय संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळलेल्या तुफानी खेळींची टीम इंडियातील निवडीसाठी महत्त्वाची भूमिका ठरेल.
(ही बातमी अपडेट होत आहे.)