Shreyas Iyer and Jasprit Bumrah are likely to return to Team Indian: आगामी आशिया चषक २०२३ स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. हायब्रीड मॉडेल अंतर्गत तो या स्पर्धेचे आयोजन करणार आहे. पाकिस्तान श्रीलंकेसोबत आशिया कपचे यजमानपद भूषवणार आहे. येथे चार सामने खेळवले जातील. त्याचबरोबर श्रीलंकेत नऊ सामने होणार आहेत. होस्टिंगचे प्रकरण स्पष्ट होताच भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचे दोन स्टार खेळाडू लवकरच संघात परतणार आहेत.
खरेतर, अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि युवा फलंदाज श्रेयस अय्यर दुखापतींमुळे बराच काळ बाहेर आहेत. हे दोन्ही खेळाडू आशिया चषकातून पुनरागमन करू शकतात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या मते, बुमराह आणि अय्यर या स्पर्धेतून टीम इंडियामध्ये पुनरागमन करू इच्छित आहेत. यासाठी दोन्ही खेळाडू प्रचंड मेहनत घेत आहेत.
बुमराह आठ-नऊ महिने क्रिकेटपासून दूर –
पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह सप्टेंबर २०२२ पासून संघाबाहेर आहे. यामुळे तो ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषकही खेळू शकला नाही. पाठीच्या दुखापतीमुळे तो गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. एप्रिलमध्ये बुमराहच्या पाठीवर न्यूझीलंडमध्ये शस्त्रक्रिया झाली होती. वैद्यकीय प्रक्रिया यशस्वी झाली आणि बुमराहला वेदनामुक्त होण्यास मदत झाली. तो आयपीएलच्या १६व्या हंगामातही खेळू शकला नाही.
पाठीच्या समस्येने अय्यर त्रस्त –
श्रेयस अय्यर पाठीच्या खालच्या दुखापतीसाठी त्याने एप्रिलमध्ये पाठीवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. पाठीच्या खालच्या भागात फुगलेल्या डिस्कमुळे त्याला सतत त्रास होत होता. यामुळे मार्चमध्ये अहमदाबाद येथे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची शेवटची कसोटी त्याला मध्येच सोडावी लागली होती. त्यानंतर मे महिन्यात लंडनमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. अय्यरला आराम करण्याचा सल्ला देण्यात आला असून त्यांचे रिहॅबिलिटेशन सुरू आहे.
बुमराह आणि अय्यर एनसीएमध्ये आहेत –
ईएसपीएन क्रिकइन्फोच्या म्हणण्यानुसार, बुमराह आणि श्रेयस हे दोन्ही खेळाडू आता रिकव्हरीसाठी एनसीएमध्ये आहेत. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया कपसाठी दोन्ही खेळाडू उपलब्ध होण्याबद्दल एनसीएचे वैद्यकीय कर्मचारी आशावादी आहेत. बुमराह प्रामुख्याने फिजिओथेरपी घेत असल्याचे समजते, पण त्याने गोलंदाजीही सुरू केली आहे. त्याचबरोबर श्रेयसची आता फिजिओथेरपी सुरू आहे.